Dharavi Masjid : मुंबईतल्या धारावीत तणाव निर्माण झाला आहे. मशिदीची बेकायदेशीर भाग तोडण्यावरुन वाद सुरु झाला. हा भाग तोडण्यासाठी जी महापालिकेची गाडी गेली त्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. तसंच या भागात जमाव एकवटला आहे. या सगळ्यानंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि सदर कारवाई होऊ नये म्हणून पत्र दिलं.

नेमकं काय घडलंं?

वर्षा गायकवाड यांच्या पत्रातील माहितीनुसार धारावीच्या परिसरात एक मशिद आहे. या मिशिदीचा काही भाग बेकायदेशीर असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेचं पथक हा बेकायदेशीर भाग तोडण्यासाठी धारावीत दाखल झाले होतं. मुंबई महापालिकेचं पथक आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडवले. तसेच बीएमसीच्या गाडीच्या काचाही फोडल्या. तसेच काही नागरिक रस्त्यावर बसले असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना ही कारवाई होऊ नये म्हणून पत्र दिलं.

वर्षा गायकवाड यांचं पत्र काय?

धारावीतील हिमालया हॉटेलजवळची मेहबुब ए सुबानिया मशिदवर तोडक कारवाईची नोटीस मुंबई महापालिकेने पाठवली आहे. सदरची मशिद अनेक वर्षांपासून अस्तित्त्वात आहे. धारावी पुनर्वसन प्राधिकरणाकडून या मशिदीच्या अतिक्रमणाची चौकशी करण्यात यावी. सदर मशिदीच्या अतिक्रमणबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घ्याव. धारावीतील मशिदीच्या तोडक कारवाईला स्थगिती द्यावी असं पत्र वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि मेहबुब एक सुबानिया मशिदीबाबत आलेल्या नोटीसची त्यांना माहिती दिली. लोकांच्या काय भावना आहेत तेपण त्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांशी मी बोलतो असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही आज मुंबई महापालिकेने बुलडोझर पाठवून तडक कारवाई सुरू केली आहे. धारावीतील लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना रात्री उशिरा भेटून या कारवाईला थांबवण्याची विनंती केली होती.

मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका आयुक्तांना विनंती करते की धारावीमध्ये सामाजिक सलोखा आणि शांततेचे वातावरण राखण्यासाठी ही कारवाई स्थगित करण्यात यावी. सर्व धारावीकर शांतता राखण्यासाठी झटत आहेत. आम्ही प्रशासन आणि पोलिसांशी सतत संपर्कात आहोत. धारावीच्या सामाजिक एकतेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.