मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी समुहाकडून करण्यात येणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) मंगळवारी बांधकाम निविदा छाननी पूर्ण करून उघडल्या असून यात अदानी समुहाने बाजी मारली. अदानी समुहाने पाच हजार कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. त्याच वेळी डीएलएफ समुहाने २०२५ कोटी रुपयांची बोली लावली असून नमन समुहाची निविदा अपात्र ठरली आहे. त्यामुळे आता धारावी पुनर्विकास प्रकल्प सर्वाधिक बोली लावणाऱ्या अदानी समुहाला मिळणार यावर शिक्कामार्तब झाले.
हेही वाचा >>> छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुटने २५ कोटी रुपयांची इमारत अशी बळकावली…
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी चौथ्यांदा जागतिक स्तरावर निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदेला जागतिक स्तरावरील आठ कंपन्यांनी उत्सुकता दर्शविली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ तीन कंपन्यांनीच निविदा सादर केल्या होत्या. डीएलएफ, अदानी आणि नमन समुहाचा त्यात समावेश होता. या निविदांची छाननी करून मंगळवारी डीआरपीने निविदा उघडल्या. छाननीअंती नमनची निविदा अपात्र ठरली. प्रकल्पासाठी एक हजार ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची बोली लावण्याची अट होती. त्यानुसार अदानी समुहाने सर्वाधिक पाच हजार कोटी रुपयांची बोली लावली असून डीएलएफ समुहाने २०२५ कोटी रुपयांची बोली लावली आहे. तर नमन समुहाची निविदा अपात्र ठरली आहे. एकूण अदानी समुहाने पुनर्विकास प्रकल्पाच्या स्पर्धेत बाजी मारली आहे. आता लवकरच राज्य सरकारच्या मान्यतेनुसार निविदा अंतिम करून पुनर्विकास प्रकल्पास सुरुवात करण्यात येणार आहे.