मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मार्ग अखेर आता मोकळा झाला आहे. धारावीतील रेल्वेच्या जागेवरील रेल्वे वसाहतीच्या कामाकरीता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (डीआरपी) प्रारंभ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता महिन्याभरात रेल्वेच्या जागेवरील रेल्वे वसाहतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर आता प्रत्यक्षात मार्गी लावला जात आहे. या प्रकल्पाचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. त्यासाठी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडची (डीआरपीपीएल) स्थापना करण्यात आली. त्यात ८० टक्के हिस्सा अदानीचा तर २० टक्के हिस्सा डीआरपीचा अर्थात राज्य सरकारचा आहे. दरम्यान नुकतेच डीआरपीपीएलचे नाव बदलून नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) असे करण्यात आले आहे. या कंपनीच्या माध्यमातून सध्या धारावीत सर्वेक्षणाचे, पात्रता निश्चितीचे काम सुरु आहे.

हेही वाचा – म्हाडा कोकण मंडळ सोडत, २२६४ घरांसाठीची ३१ जानेवारीची सोडत पुन्हा पुढे ढकलली

हेही वाचा – एक रुपयात पीकविमा बंद? बोगस अर्ज, गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात धारावीतील रेल्वेच्या जागेवरील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासस्थानाच्या इमारतींच्या कामापासून प्रकल्पास सुरुवात केली जाणार आहे. त्यानुसार आता या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.रेल्वेच्या जागेवर रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ३० मजली तीन इमारती सेवानिवासस्थाने म्हणून बांधल्या जाणार आहेत. त्याच जागेवर रेल्वेसाठी २० मजली कार्यालयही बांधून दिले जाणार आहे. त्या चार इमारतींच्या कामाला महिन्याभरात सुरुवात होणार आहे. त्या कामासाठी डीआरपीला प्रारंभ प्रमाणपत्र मिळाले आहे. डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी यास दुजोरा दिला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

Story img Loader