देशात करोनाची सुरुवात झाल्यानंतर मुंबईकरांना आणि महाराष्ट्रालाही करोनाचं उग्र रूप पहिल्यांदा दाखवलं ते धारावीनं! मोठ्या प्रमाणावर दाटीवाटीच्या असलेल्या या भागामध्ये वेगाने वाढणाऱ्या करोनाला आवर घालणं हे मोठं आव्हान मुंबई महानगर पालिका प्रशासनासमोर होतं. मात्र त्यावर मात करत ही रुग्णसंख्या नियंत्रणातच आली नाही, तर धारावीनं जगासमोर एक ‘मॉडेल’च उभं केलं आहे. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये धारावीत पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याचं दिसल्यानंतर आता धारावीनं पुन्हा एकदा आपलं मॉडेल सिद्ध केलं आहे. गेल्या २ दिवसांत धारावीमध्ये करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही!
आठवड्याभरात कमी झाली रुग्णसंख्या!
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये धारावीमध्ये रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली होती. त्यानंतर धारावी मुंबईतील करोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. या वर्षी देखील दुसऱ्या लाटेमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्यामुळे धारावी पुन्हा हॉटस्पॉट होतेय की काय? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, धारावीकरांनी आणि मुंबई महानगर पालिकेनं पुन्हा एकदा धारावीमध्ये शून्य रुग्णसंख्या करून दाखवली आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये धारावीमध्ये रुग्णसंख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती.
Mumbai’s Dharavi records zero cases of #COVID19 for the second day. Active cases stand at 11, as per the Municipal Corporation of Greater Mumbai
— ANI (@ANI) June 15, 2021
धारावीमध्ये फक्त ११ अॅक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारप्रमाणेच मंगळवारी देखील धारावीत एकही करोना रुग्ण आढळला नाही. मात्र, त्याचवेळी धारावीत फक्त ११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे धारावीकरांसाठी आणि मुंबई पालिका प्रशासनासाठी देखील ही दिलासादायक बाब ठरली आहे.
घरोघरी लसीकरणाला सध्या तरी परवानगी नाही!
शून्य रुग्ण दिवस!
धारावीचे अतिरिक्त आयुक्त किरण दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार धारावीमध्ये या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शून्य रुग्ण दिवस पाहायला मिळाला होता! मात्र, त्यानंतर पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्ये धारावीत मोठ्या संख्येनं रुग्ण वाढले. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर शून्य रुग्णसंख्येचे सलग दोन दिवस पालिकेसाठी महत्त्वाचे ठरले आहेत.