लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : धारावी पुनर्विकासासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाने नवा टप्पा गाठत वरच्या मजल्यावरील घरांसह ६३ हजार झोपड्पट्टीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वी तळमजला आणि व्यावसायिक गाळ्यांसह करण्यात आलेल्या ६० हजार सर्वेक्षणाचा टप्पाही आता ओलांडला आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीकरांच्या पात्रता निश्चितीच्या अनुषंगाने धारावी पुनर्वसन प्राधिकरण (डीआरपी) आणि नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) यांच्या माध्यमातून झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात होऊन नुकतेच एक वर्षे पूर्ण झाले असून या एका वर्षात धारावीतील ६३ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. हे सर्वेक्षण आणि धारावीकरांची पात्रता निश्चितीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे डीआरपीचे उद्दिष्ट आहे.

महत्त्वाचे म्हणजे २००७-०८ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६० हजार झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार धारावीत ६० हजार झोपड्या असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता एनएमडीपीएलच्या सर्वेक्षणानुसार आतापर्यंत ६३ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून ही संख्या अंतिम सर्वेक्षणापर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. झोपड्यांची संख्या अंदाजे दीड लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणाला १८ मार्च २०२४ पासून सुरुवात

धारावीच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याला अर्थात रेल्वेच्या जागेवरील बांधकामास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे धारावीतील झोपड्यांचे सर्वेक्षण करून झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करण्याचे काम वेगात सुरू आहे. या सर्वेक्षणाला १८ मार्च २०२४ रोजी सुरुवात झाली होती. सर्वेक्षण सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षात ६३ हजार बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. तर सर्वेक्षणानंतर आतापर्यंत ८९ झोपड्यांना क्रमांक देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या वर्षी सुरू झालेल्या सर्वेक्षणाला अनेक रहिवाशांनी विरोध केला. काही ठिकाणी सर्वेक्षण रोखून धरण्यात आले. मात्र असे असतानाही वर्षभरात ६३ हजार बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून सर्वेक्षणाचे काम येत्या काही दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही डीआरपीकडून सांगण्यात येत आहे.

…तर दुसरी संधी नाही

धारावी पुनर्विकासाअंतर्गत अपात्र रहिवाशांसह वरच्या मजल्यावरील रहिवाशांचेही पुनर्वसन करण्यात येणारआहे. ही बाब लक्षात घेता एनएमडीपीएलने अंदाजे दीड लाख झोपड्यांच्या सर्वेक्षणाची तयारी केली आहे. त्यामुळे धारावीतील पात्र-अपात्र झोपडीधारकांची संख्या दीड लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मशाल संस्थेने २००७-०८ मध्ये ६० हजार झोपड्यांचे सर्वेक्षण केले होते. एनएमडीपीएलने आता ६३ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यात तळमजल्यासह वरच्या मजल्यावरील बांधकामाचाही समावेश आहे.

दरम्यान, जे रहिवासी सर्वेक्षणाअंतर्गत कागदपत्रे जमा करणार नाहीत, त्यांना सर्वेक्षण संपुष्टात आल्यानंतर दुसरी संधी दिली जाणार नाही, असा इशाराही डीआरपीकडून देण्यात आला आहे.