७६ हजार नागरिकांना लसलाभ

शैलजा तिवले
मुंबई : धारावीत सुमारे सात लाख लोकसंख्या असून यातील केवळ ११ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. धारावातील आतापर्यंत ७६ हजार जणांना लस दिली गेली आहे. यात सुमारे ६० टक्के लसीकरण हे पालिकेच्या केंद्रावर, तर ४० टक्के हे जुलैपासून सामाजिक उत्तरदायित्वातून प्राप्त झालेल्या लशींच्या माध्यमातून झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लशीबाबतची भीती, गैरसमज यामुळे धारावीमध्ये लसीकरणाला सुरुवातीला विशेष प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे धारावीमध्ये स्वतंत्र लसीकरण केंद्र पालिकेने सुरू केले. मार्चमध्ये येथे केवळ १३४९ जणांनी लस घेतली होती. यानंतर पालिकेने लससाक्षरता करण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली आणि लसीकरणाचा प्रतिसाद वाढला. त्यामुळे एप्रिलमध्ये ही संख्या १० हजार ६४८ वर गेली. लसीकरण मोठय़ा प्रमाणात करण्यासाठी धारावीत आणखी दोन केंद्र सुरू करण्यात आली. मे महिन्यात पालिकेला लशींचा साठाच कमी प्रमाणात मिळाल्यामुळे लसतुटवडा निर्माण झाला. परिणामी तीन केंद्रे असूनही धारावीत मेमध्ये ८३८९ जणांचे लसीकरण झाले.

धारावीत अनेक उद्योगधंदे, कारखाने आहेत. येथील कामगार वर्गही मोठय़ा प्रमाणात कामासाठी बाहेर जातो. त्यामुळे येथील कामगार वर्गाचे लसीकरण वाढणे गरजेचे आहे, असे मत विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी व्यक्त केले.

लस घेण्यासाठी धारावीकर रांगेत

सुरुवातीला धारावीत लस घेण्याबाबत भीती होती. आता जवळच्या नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी ही लस घेतल्यामुळे येथील रहिवाशांच्या मनातील लशीची भीती गेली असून मोठय़ा प्रमाणात नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. परंतु आता लशीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे अनेक जण ताटकळत आहेत, असे धारावीमध्ये लससाक्षरता करणाऱ्या भारतीय जैन संघटनेचे राहुल नहाता यांनी सांगितले.

जुलैमध्ये सर्वाधिक लसीकरण

जूनपासून लससाठा काही अंशी वाढल्यामुळे येथे ९२६८ जणांचे लसीकरण झाले. यात जुलैमध्ये एकूणच पालिकेला लससाठा अधिक मिळाल्यामुळे धारावीतील केंद्रावर लस  उपलब्ध होऊ शकली. त्यामुळे आतापर्यत सर्वाधिक १७,६५७ लसीकरण होऊ शकले.

पालिकेमार्फत ४६ हजार २४ जणांचे लसीकरण

ऑगस्टमध्ये पुन्हा लससाठय़ाचा तुटवडा निर्माण झाल्याने पालिकेच्या केंद्रावरील लसीकरणात घट झाल्याचे दिसून येते. २१ ऑगस्टपर्यंत ६१६१ लसीकरण झाले आहे. आतापर्यंत पालिकेमार्फत धारावीतील तीन केंद्रांवर एकत्रितरीत्या ४६ हजार २४ जणांचे लसीकरण झाले आहे.

धारावीतील लसीकरण वाढविण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वातून उपलब्ध झालेल्या लशींच्या माध्यमातूही लसीकरण सुरू केले आहे. तसेच सामाजिक संस्थाही कार्यरत आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने या भागातील लसीकरण वाढविण्यासाठी भर दिला जात आहे.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका