गावातील बँकेतून रोज २५ लाखांहून अधिक रकमेचा पुरवठा ; रोकडविरहित व्यवहारात ५ ते १० टक्केच नागरिक
मुरबाड तालुक्यातील धसई हे गाव देशातील पहिले रोखरहित गाव असल्याचा गवगवा सरकारी पातळीवरून करण्यात आला असला, तरी या गावातील बहुतांश व्यवहार अजूनही रोखीनेच होत असल्याचे दिसते. रोखरहित व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत व्यवस्थेचा अभाव, दुबळी बँकिंग यंत्रणा तसेच नागरिकांमधील या व्यवहारांबाबतची अनास्था यामुळे ‘कॅशलेस धसई’ फक्त प्रचार आणि घोषणांतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील ग्रामस्थ दैनंदिन खर्चासाठी दररोज लाखो रुपये गावातील बँकेतून काढत असून, डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याचा आग्रह धरणाऱ्यांची संख्यादेखील सुमारे पाच ते दहा टक्केच असल्याचे दिसते आहे.
येथे भरवण्यात आलेल्या एका शासकीय दाखले वाटप जत्रेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे गाव रोकडविरहित झाल्याची घोषणा केली होती. एका संस्थेच्या मदतीने गावातील काही व्यापाऱ्यांनी ‘बँक ऑफ बडोदा’तर्फे ‘स्वाइप’ यंत्रे मिळवून रोकडरहित व्यवहार करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच गावातील अनेकांचे जन-धन खाते असल्याने एटीएम कार्डदेखील ग्रामस्थांकडे उपलब्ध होते. या बळावर हे गाव रोकडरहित झाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी गावात एकूण १५०च्यावर असलेल्या व्यापाऱ्यांपैकी केवळ ३० जणांकडेच स्वाइप यंत्रे आहेत. यापैकी ४५ व्यापाऱ्यांनी त्यासाठी अर्ज केला असून उर्वरित व्यापाऱ्यांनी अद्याप तसा अर्जही केलेला नाही. त्यामुळे रोकडविरहित झाल्याची घोषणा होऊन दोन आठवडे झाले असूनही गावातील ९० टक्के व्यवहार रोखीनेच चालतात. ज्या ३० व्यापाऱ्यांकडे पैसे स्वीकारण्यासाठी स्वाइप यंत्रे आहेत, त्यांच्याकडे डेबिट कार्डाचा वापर करून स्वाइप करणाऱ्यांची संख्या ही जास्तीत जास्त १० टक्केआहे.
गावातील विजया बँक या एकमेव राष्ट्रीयीकृत बँकेतून रोज २५ लाखांहून अधिक रक्कम काढली जात असल्याची माहिती बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली. त्यावरून ग्रामस्थ रोजच्या व्यवहारांसाठी चलनाचाच वापर करत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. या गावात एकमेव सायबर कॅफे असून तेथे बीएसएनएलमार्फत इंटरनेट पुरवठा होतो, मात्र ही इंटरनेट सेवा नित्य कोलमडत असून ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आदींच्या संकेतस्थळांवरून ऑनलाइन व्यवहार करून एखादी वस्तू गावाच्या पत्त्यावर मागवण्याची झाल्यास ती या पत्त्यावर पोहचत नसल्याने आमच्याकडून ऑनलाइन व्यवहार शक्यतो होत नाही, असे येथील काही तरुणांनी सांगितले. मात्र आपले गाव खरोखरच ‘कॅशलेस’ व्हावे, अशी इच्छा येथील तरुणाईत दिसून येते. (‘कॅशलेस धसई’वरील खास रिपोर्ताज – रविवार विशेष पानात)