टिटवाळा-आंबिवली या स्थानकांदरम्यान कपलिंग तुटून झालेल्या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या धवल लोढाया या तरुणाच्या मृत्यूला रेल्वेचा हलगर्जीपणा आणि अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी आणि धवलसह प्रवास करणाऱ्या मित्राने केला आहे. जखमी धवलला तातडीने मदत मिळाली असती, तर त्याचा जीव वाचला असता. मात्र घटनास्थळी आलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, रेल्वे अधिकारी हे अपघाताची पाहणी करण्यातच मग्न होते, असा आरोप त्यांनी केला.
रेल्वेच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ धवलचे मित्र, कुटुंबीय आणि प्रवासी यांनी घाटकोपर ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यान मोर्चा काढून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे याबाबत निषेध नोंदवला. आता २७ मार्चला होणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या चौकशीदरम्यान हा मित्र आणि कुटुंबीय यांनाही साक्षीला बोलावण्यात येणार आहे.
डी-कपलिंगमुळे रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वेचे डबे रुळांवरून घसरले. त्यामुळे धवल लोढाया याला जबरदस्त मार बसला. हा अपघात झाल्याच्या ठिकाणी पोहोचण्यास रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनाही वेळ लागला. मात्र स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक पोलीस त्वरीत पोहोचले होते. मात्र आपला मित्र विव्हळत असतानाही यांच्यापैकी एकानेही त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न केले नाहीत, असे धवलसह प्रवास करणाऱ्या जय या त्याच्या मित्राने सांगितले. अपघाताच्या ठिकाणी पोहोचलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मदत करण्याऐवजी अपघाताची छायाचित्रे काढण्यात रमले होते, असेही त्याने सांगितले.
मध्य रेल्वेकडे सुरक्षाविषयक उपाययोजनांची कमतरता आहे. तसेच या प्रकरणी तर रेल्वे अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा यांमुळे धवलला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. सोमवारी काढलेल्या निषेध मोर्चानंतर लोढाया कुटुंबियांनी रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांची भेट घेत आपला निषेध व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhawal death due to railways negligence