मुंबई : ध्रुव राठी व इतर एक्स (पूर्वीचे ट्विटर) समाजमाध्यमांवरून सनदी अधिकारी अंजली बिर्ला यांच्यावरील आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी ध्रुव राठी यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आला असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. अंजली बिर्ला यांच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे एक्स समाजमाध्यमावर टाकण्यात आली होती. तसेच, अंजली बिर्ला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्या असल्याने परीक्षा न देताच त्या लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या, अशा आशयाची विधाने एक्स या समाजमाध्यमावरून करण्यात आली होती.
अंजली बिर्ला यांनी २०१९ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. तसेच, योग्य प्रक्रियांद्वारे परीक्षा उत्तीर्ण होऊन सध्या दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, ध्रुव राठी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अंजली बिर्ला यांच्याविरोधात अनेक आक्षेपार्ह, अपमानकारक पोस्ट करण्यात आल्या. त्यात अंजली यांचे खासगी छायाचित्रे त्यांच्या परवानगीशिवाय प्रसारित करण्यात आले होते. तसेच, त्या प्रोफेशनल मॉडेल असल्याचेही खोटी टिपण्णी करण्यात आली होती. शिवाय, एका प्रयत्नात त्या सनदी अधिकारी बनल्या असाही दावा करण्यात आला होता. त्यामुळे अंजली बिर्ला यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे. असे आरोप करत नमन महे वरी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
हेही वाचा : प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने बनावट व्हॉटसॲप खाते, महाराष्ट्र्र सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल
अंजली बिर्ला या तक्रारदाराच्या मामे बहीण आहेत. दरम्यान, ट्विटरवरून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्या असल्याने परीक्षा न देताच त्या लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या, अशा आशयाची विधाने करण्यात आल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाबद्दल जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.