मुंबई : मुंबई महानगरपालिकेने असंसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांतर्गत वर्षभरात ३० वर्षांवरील जवळपास १३ लाख नागरिकांची मधुमेह आणि रक्ततपासणी करण्यात आली. मधुमेह व रक्तदाब तपासणी केंद्रातर्फे अडीच लाख नागरिकांची, तर आरोग्य सेविका व आशा सेविकांनी घरोघरी जाऊन केलेल्या सर्व्हेक्षणात १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. निरोगी जीवनशैली व विशेषतः निरोगी हृदयासाठी ३० वर्षांवरील नागरिकांनी नियमितपणे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जागतिक हृदय दिन व राष्ट्रीय पोषण माह निमित्ताने केले आहे.
हेही वाचा >>> Konkan Railway : कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल, रविवारपासून नवे वेळापत्रक
मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये व विशेष रुग्णालये मिळून २६ मधुमेह व रक्तदाब तपासणी केंद्रातर्फे ऑगस्ट २०२२ पासून आजपर्यंत ३० वर्षांवरील सुमारे अडीच लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच जानेवारी २०२३ पासून आरोग्य सेविका व आशा सेविका ३० वर्षांवरील व्यक्तींच्या घरी जाऊन उचरक्तदाब तपासणी सर्वेक्षण करीत आहेत. आतापर्यंत एकूण १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६८ हजार वैद्यकीयदृष्ट्या संशयित नागरिकांना संदर्भित करून ९ हजार ६०० रुग्णांना उच्च रक्तदाबासाठी निदान व उपचार देण्यात आले आहेत. त्याचबरोबर महानगरपालिका दवाखाना व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांना विनामूल्य तपासणी व उपचार देण्यात येत आहेत. २० हजार रुग्णांना आहारतज्ज्ञांमार्फत उच्च रक्तदाब व मधुमेहाबाबत समुपदेशन सेवा दिली आहे. निरोगी व आरोग्यदायी जीवनशैलीकरीता १३८ योग केंद्र सर्व विभागात सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत २६ हजार ७४२ मुंबईकर योग केंद्रात सहभागी झाल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.
हेही वाचा >>> विक्रोळीत मिरवणुकीत सहभागी तरूणांनी केला महिला पोलिसांचा विनयभंग
मुंबईमध्ये २०२२ मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व इतर हृदयरोगामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. हृदयरोग संबंधित आजार हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याने नागरिकांना हृदयरोग व पोषक आहाराचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. यामुळे हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह, उच्च रक्तदाब या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
– डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे), मुंबई महानगरपालिका
नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी
१. आहारात मीठ, साखर व खाद्यतेलाचे प्रमाण कमी ठेवा.
२. दारू तसेच धूम्रपान, तंबाखू सेवन टाळा.
३. ३० वर्षांवरील नागरिकांनी मधुमेह व रक्तदाब आजारांची नियमित तपासणी करावी.
४. नियमित औषधोपचाराने मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा. ५. दररोज कमीतकमी ३० मिनिट चालणे, नियमित व्यायाम व योगा करा.