भाऊ अनीस याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला ‘एके ४७’ दिल्याचे समजताच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चांगलाच संतापला होता. छोट्या भावाच्या या कारनाम्यामुळे तो इतका खवळला की, त्याने भावाला चांगले चोपून काढल्याचा दावा दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी ‘Dial D for Don’ या आपल्या पुस्तकात केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने पुस्तकातील काही भाग प्रसिद्ध केला असून, यात अन्य अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याला दाऊदबरोबर संवाद साधण्यास मनाई केल्याचे नीरज कुमार यांनी पुस्तकात म्हटले आहे. २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणा दरम्यान दाऊदशी वार्तालाप झाल्याचा उल्लेखदेखील पुस्तकात आहे. नीरज कुमार यांच्या म्हणण्यानुसार जून २०१३ मध्ये एके दिवशी अचानक त्यांच्या वैयक्तिक मोबाईल फोनवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. पलीकडून दाऊद बोलत होता. ‘क्या साहब, आप रिटायर होने जा रहे हैं? अब तो पीछा छोड़ दो।’ असे तो म्हणाला.
चार वेळा दाऊदबरोबर दूरध्वनीवरून वार्तालाप झाल्याचा दावा ‘Dial D for Don’ मध्ये नीरज कुमार यांनी केला आहे. फोनवरील वार्तालापादरम्यान त्यांनी डॉनबरोबर मुंबई बॉम्बस्फोटाचा विषय छेडला होता. मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्तांकडे त्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ते त्याला खूप ओरडल्याचेदेखील दाऊदने नीरज यांना सांगितले.
नीरज यांनी संजय दत्तला ‘एके ४७’ देण्यावरून भावाला मारल्याबद्दल विचारले असता त्याने त्यास होकार दिला. याप्रकरणी दोषी आढळून आलेला संजय दत्त येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. साहेब मी आपल्याला काही सांगण्या आगोदर आपणच मला सांगा की, मी मुंबईत स्फोट घडवून आणल्याचे आपल्याला वाटते का? असा प्रश्न दाऊदने नीरज कुमार यांना केला असता, माझ्या प्रश्नाचे उत्तर तू प्रतिप्रश्न विचारून का देत आहेस? मला काय वाटते याच्याशी तुला काहीही देणेघेणे नाही. जर तुला आणखी काही बोलायचे असेल तर बोल, असे नीरज कुमार यांनी त्याला म्हटल्याचा उल्लेख पुस्तकात आहे. दाऊदने एकदम मुंबईच्या ढंगात आपल्याशी वार्तालाप साधल्याचे नीरज यांनी पुस्तकात म्हटले आहे. ना त्याने मला खूश करण्याचा प्रयत्न केला, ना त्याला कोणत्या गोष्टीचे भय असल्याचे त्याच्या बोलण्यावरून जाणवल्याचे नीरज यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा