मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल आरोपी मॉरिस भाईकडे ठेवण्यासाठी अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला काही रक्कम देण्यात आली होती का ? याबाबत गुन्हे शाखा तपास करीत आहे. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिश्राला न्यायालयाने १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात आरोपी मॉरिस नरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई (४७) याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मॉरिसने हत्येसाठी वापरलेले पिस्तुल त्याचा सुरक्षा रक्षक अमरेंद्र मिश्रा याचे असून त्याचा परवानाही मिश्राच्या नावावर आहे. त्यामुळे भारतीय हत्यार बंदी कायदा कलम २९ ब व ३० अंतर्गत मिश्राला अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील फूलपूर येथून या पिस्तुलाचा परवाना मिश्राने २०१३ मध्ये घेतला होता. मिश्रा तीन ते चार महिन्यापासून मॉरिसकडे अंगरक्षक म्हणून काम करत आहे. तो पिस्तुल व काडतुस मॉरिसच्या कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर ठेवत होता. नियमानुसार मिश्राने मुंबईत पिस्तुल आणण्यापूर्वी त्याची नोंदणी येथे करणे आवश्यक होते. पण त्याने तसे केले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी गुन्हे शाखेने घटनास्थळावरून सहा रिकाम्या पुंगळ्या, सीसी टीव्हीचा डीव्हीआर, पाच मोबाइल संच, चालण्यात आलेल्या तीन गोळ्यांचे सिस व पिस्तुल अशा वस्तू जप्त केल्या आहेत.
मिश्रा आपले पिस्तुल मॉरिस भाईच्या कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर ठेवायचा. ते पिस्तुल तेथे ठेवून जाण्यासाठी मिश्रा व मॉरिस यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाले होते का ? याबाबत गुन्हे शाखा तपास करीत आहे. दरम्यान, मिश्राला शनिवारी सुटीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने मिश्राला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मला या प्रकरणात फसवले गेले – मिश्रा
माझ्यावर अन्याय झालाय. मला याप्रकरणी फसवले गेले, असे अटक आरोपी अमरेंद्र मिश्राने प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला घेऊन जात असताना प्रसिद्धी माध्यमांना पाहून मिश्राने माझ्यावर अन्याय झाला, चुकीचे झाले. मला फसवले गेले असे म्हटले.
हेही वाचा – पनवेल – कर्जत रेल्वे मार्गातील बोगद्याचे दोन किमी खोदकाम पूर्ण
पतीच्या सुरक्षेबाबत चिंतीत – सोनी मिश्रा
माझ्या नवऱ्याला कटामध्ये अडकवण्यात आले आहे. पोलीस कोठडीत पतीच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याचे मिश्राची पत्नी सोनी मिश्रा यांनी सांगितले.