निवडणूक म्हटली की, त्यात प्रतिस्पध्र्यावर आरोप-प्रत्यारोप होणे अध्याहृत असते. मग ती निवडणूक राजकीय असो, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची असो किंवा नाटय़परिषदेच्या नियामक मंडळाची! २०१३-१८ या कालावधीसाठी नाटय़परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर या नियामक मंडळात आपले जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी आणि पर्यायाने अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान होण्यासाठी आता दोन विरोधी पॅनल्सचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यात ‘उत्स्फूर्त पॅनल’च्या मोहन जोशींनी ‘नटराज पॅनल’मधील अनेक सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
३० जून २०१० रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत तत्कालीन सहकार्यवाह जयंत जातेगावकर यांनी आपल्या राजीनाम्याबाबत चर्चा न झालेले अनेक मुद्दे व निर्णय सभेच्या इतिवृत्तात दडपून लिहिल्याचा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे. त्याचप्रमाणे बँकांतील आपल्या स्वाक्षऱ्यांबद्दल कोणताही ठराव नियामक मंडळात झाला नसताना प्रमुख कार्यवाह व सध्या ‘नटराज पॅनल’मध्ये असलेल्या स्मिता तळवलकर यांनी बँकांना खोटे ठराव आणि पत्रे पाठवून बँकांमधील स्वाक्षऱ्या बदलल्या. तसेच बदललेल्या स्वाक्षऱ्यांनी त्यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार केले. हा आर्थिक गैरव्यवहार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होऊ शकतो, असा गंभीर आरोप जोशी यांनी पत्राद्वारे केला आहे.
त्याचप्रमाणे सध्याच्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून नाशिकच्या विश्वास ठाकूर यांची नियुक्ती कशी करण्यात आली, असाही प्रश्न मोहन जोशी यांनी उपस्थित केला आहे. तसेच मतपत्रिका छापताना गैरव्यवहार झाले असून विनय आपटे यांनी बोगस मतपत्रिका छापल्याचा ठपका मोहन जोशी यांनी ठेवला आहे.
या आरोपांना विनय आपटे यांनीही तेवढय़ाच तिखटपणे उत्तर दिले आहे. नियामक मंडळाच्या सभेचा इतिवृत्तांत म्हणजे घरची रोजनिशी नाही. तो लिहिताना त्यात फेरफार करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, हे आम्हालाही कळते. त्यामुळे जोशी यांनी केलेला आरोप धादांत खोटा आहे, असे आपटे यांनी सांगितले. बँकांमध्ये स्वाक्षऱ्यांत फेरफार केल्याचा आरोप अतिशय गंभीर आहे. त्याबाबत त्याच्याशी संबंधित असलेले सर्वच सदस्य चर्चा करून एक पत्र सर्वच प्रसारमाध्यमांकडे पाठवणार आहोत. मात्र पराभव समोर दिसत असल्याने मोहन जोशी असे बेताल आरोप करत आहेत, असा टोला आपटे यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा