अगदी आदिम काळापासून आजवरच्या शस्त्रांमध्ये तलवारीइतके महत्त्व अन्य कोणत्याही शस्त्राला मिळाले नसेल. आधुनिक शस्त्रांच्या जगातही तलवारीने आपली झळाळी कायम राखली आहे. घोडय़ावर स्वार होऊन म्यानातून शानदारपणे तलवार उपसणारा, ती सफाईदारपणे फिरवणारा आणि आजूबाजूच्या पाच-दहा शत्रूसैनिकांना सहज गारद करणारा योद्धा ही जगभरच्या संस्कृतींमध्ये शौर्याची कल्पना राहिली आहे. तिचा प्रभाव क्वचितच ओसरला असेल. तलवारींचे जगातील विविध संस्कृतींमधील स्थानही तितकेच उच्च राहिले आहे. आजही सेनादलांमध्ये समारंभात वापरल्या जाणाऱ्या तलवारींचे महत्त्व अबाधित आहे. सेनादलांच्या प्रशिक्षण अकादमींमध्ये सर्वोत्तम कँडेटना दिली जाणारी ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ मिळवण्यासाठी प्रशिक्षणार्थीमध्ये चढाओढ असते. ती मिळवल्यानंतरचा आनंद आणि सन्मान आयुष्यभर सोबत राहणारा असतो. पाहुण्याला तलवार भेट देणे हा मोठा सन्मान आहे आणि ते विश्वासाचे प्रतीक मानले जाते.
जगभरच्या पुराणांमध्ये इतिहासात अनेक तलवारी आणि त्यांच्या योद्धय़ांसंबंधी मिथके आढळतात. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि किंग आर्थरला जलदेवतेने (लेडी ऑफ द लेक) बहाल केलेली एक्सकॅलिबर तलवार या सर्वाधिक गाजलेल्या तलवारी. ग्रीक कथांमध्ये क्रोनॉसने त्याचे वडील युरेनस यांची सत्ता उलथवून टाकताना वापरलेली हार्प, ज्युलियस सीझरची कॉर्सिया मोर्स, अटिला द हून याची स्वोर्ड ऑफ मार्स, चिनी मिथकांतील स्प्रिंग आणि ऑटम ऋतूंच्या गिआनजियांग आणि मोये या तलवारींना दैवी शक्ती प्राप्त असल्याचे मानले जायचे.
जागतिक साहित्यात तलवारीइतके स्थान अन्य कोणत्याही शस्त्राला लाभले नसेल. स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या पराक्रमाची महती गाणारा ‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात’ हा पोवाडा असो किंवा क्रिमियन युद्धात (बॅटल ऑफ बॅलाक्लाव्हा – २५ ऑक्टोबर १८५४) ब्रिटिश घोडदळाच्या तलवारबाजांचे गुणगान करणाऱ्या लॉर्ड आल्फ्रेड टेनिसन यांच्या ‘चार्ज ऑफ द लाइट ब्रिगेड’ या कवितेतील ‘फ्लॅश्ड ऑल देअर सेबर्स बेअर, फ्लॅश्ड अॅज दे टन्र्ड इन एअर, सेबरिंग द गनर्स देअर, चार्जिग अॅन आर्मी, व्हाइल ऑल द वर्ल्ड वंडर्ड’ या पंक्ती असोत; तलवारीचा महिमा सर्वव्यापी असाच आहे.
विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यात ४०० हून अधिक ठिकाणी तलवारींचे उल्लेख सापडतात. शेक्सपिअर ज्या काळात वावरला तो युरोपमधील ‘रेनेसाँ’चा काळ होता. सर्वच क्षेत्रांत बदल होत होते. तेव्हा इंग्लंडमध्ये आणि युरोपातही बारीक, निमुळत्या, टोकदार आणि लवचीक ‘रेपियर’ नावाच्या तलवारी प्रचलित होत्या. सरदार-दरकदारांपासून सामान्य माणसांमध्येही रेपियर घेऊन फिरण्याची फॅशन होती आणि त्यामुळे रस्तोरस्ती किरकोळ कारणांवरून दोन हात होण्याचे प्रसंगही कायम उद्भवत. त्यासाठी इटालियन गुरूंच्या तलवारबाजीच्या शिकवण्या लावल्या जात. तलवारबाजीच्या डावपेचांचे सचित्र वर्णन करणाऱ्या पुस्तिकाही प्रचलित होत्या. शेक्सपिअरच्या लिखाणात त्याचे बरेचसे प्रतिबिंब उमटलेले दिसते. शेक्सपिअरने त्याच्या विविध पात्रांना त्यांच्या स्वभावानुसार तलवारी दिलेल्या दिसतात. रोमिओ आणि ज्युलिएटमधील रोमिओला त्याच्या रोमँटिक स्वभावानुसार नजाकतीत वापरण्यात येणारी रेपियर दिलेली आहे, तर मॅकबेथ आणि अन्य पात्रांना त्यांच्या स्वभावानुसार अधिक घातक तलवारी दिल्या आहेत.
सचिन दिवाण
sachin.diwan@expressindia.com