मुंबई : महानगरपालिका प्रशासनातर्फे बोरिवली येथील गोराई परिसरातील आरएससी सिक्स रोड भागातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. संबंधित रस्त्यावरील निम्म्या भागाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अपूर्ण आहे. मात्र, रस्त्याच्या काँक्रीटीकरणापूर्वी जलवाहिनी टाकण्याचा विसर पडल्याने महापालिकेने नवीन रस्त्यावर पुन्हा खोदकाम केले आहे. परिणामी, स्थानिक नागरिकांमध्ये महापालिकेच्या कामकाजाबाबत संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महानगरपालिकेने खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जात आहे. येत्या मेअखेरपर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत रस्ते कामांना वेग देण्यात आला आहे.

मात्र, अनके ठिकाणी रस्त्यांची कामे संथगतीने होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. बोरिवलीतील गोराई भागात महानगरपालिकेने आरएससी सिक्स रस्त्याचे काम हाती घेतले आहे. संबंधित रस्त्याच्या निम्म्या भागाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पालिकेने नुकतेच या रस्त्यावर पुन्हा खोदकाम केले आहे. पालिकेने नुकताच काँक्रीटीकरण केलेला रस्ता खोदल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

रस्त्याच्या मधोमध खोदकाम

जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्याच्या मधोमध मोठा चर खोदण्यात आला आहे. परिणामी, नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून वाहने चालवावी लागत आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित रास्ता उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिकांकडून टीका केली जात आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत पालिकेच्या कारभारावर प्रशचिन्ह उपस्थित केले आहे. महापालिकेच्या कामातील नियोजनाअभावी नागरिकांनी आयुष्यभर त्रास सहन करायचा का, शहरात सुरू असलेला विकासकामांचा गोंधळ, प्रदूषण यावर कुणाचा अंकुश आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी संताप व्यक्त केला.

रस्तेनिहाय अहवाल १५ दिवसांत देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

मुंबईकरांना खड्डेमुक्त मुंबईचे स्वप्न पाहायला लावणाऱ्या महापालिकेकडून वारंवार नियोजनाअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेकांकडून पालिकेच्या काँक्रीटीकरण प्रकल्पालाच विरोध होऊ लागला आहे. वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम विभागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नुकतीच पाहणी केली. मुंबई उपनगरात सुरू असलेली रस्त्याची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा, आता कोणतेही नवीन काम हाती घेऊ नका, रस्त्याची कामे पूर्ण केल्याचा रस्तेनिहाय अहवाल १५ दिवसांत द्या. तसेच पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना ॲड आशिष शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्या.