ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-ऐरोली स्थानकादरम्यान दिघा स्थानकाचे काम या वर्षा अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती एमआरव्हिसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) देण्यात आली आहे. त्यानंतर प्रवाशांना आणखी एक नवीन स्थानक उपलब्ध होणार आहे. ऐरोली ते कळवा उन्नत मार्ग प्रकल्पातील दिघा स्थानक हा पहिला टप्पा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, बेलापूर – अलिबाग आता केवळ सव्वा तासात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई येथील एका कार्यक्रमातून दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाचे भूमिपूजन रिमोट कंट्रोलद्वारे डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात २०१८ मध्ये कामाला सुरुवात झाली. या स्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी मार्च २०२० आणि त्यानंतर मार्च २०२२ अशी मुदत निश्चित करण्यात आली होती. आता डिसेंबर २०२२ पर्यंत काम पूर्ण करून दिघा स्थानक प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी माहिती एमआरव्हिसीकडून देण्यात आली. तिकीट खिडक्या, संरक्षक भिंत, प्रसाधनगृहे ही कामे पूर्ण झाली आहेत. तर फलाट आणि त्यावरील छत, पादचारी पूल, भुयारी मार्ग ही काही कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले.दिघा रेल्वे स्थानक सुरू झाल्यास ऐरोली नॉलेज पार्कमधील आयटी पार्क, विटावा, गणपती पाडा, आनंद नगर, दिघा, विष्णुनगर येथील रहिवाशांना फायदा होणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई: मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वाचले तरुणीचे प्राण

ऐरोली-कळवा उन्नत मार्ग
ठाणे स्थानकातील प्रवाशांचा भार हलका व्हावा यासाठी लोकलच्या माध्यमातून कल्याण थेट नवी मुंबईला जोडण्यासाठी कळवा ते ऐरोली उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) हाती घेतला आहे. या मार्गीकेत १०८० झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार असून सध्या ९२४ जणांना भाडेतत्वावर घर देण्याची प्रक्रिया सुरू आहे. २०९ रहिवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असून सुरुवातीला ११३ जणांना घर उपलब्ध करून देण्यात आल्याचे एमआरव्हिसीकडून सांगण्यात आले. यातील ८७१ झोपडीधारकांनी पुनर्वसनास नकार दिल्यामुळे पडताळणी रखडली आहे. परिणामी ऐरोली-कळवा उन्नत मार्ग प्रकल्प रखडला आहे. मात्र यातील दिघा रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digha station will be completed by the end of the year mumbai print news amy