डिजिटल राख्यांना ऑनलाइन बाजारात मागणी; राख्या मोबाइलवर स्कॅन केल्यावर अनोखा संदेश

पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : टाळेबंदीचे निर्बंध, लांबच्या प्रवासावर आलेल्या मर्यादा, करोनाची धास्ती यांमुळे यंदाच्या रक्षाबंधनावर  महामारीचे सावट दिसू लागले आहे. श्रावणात मध्यावर येणारा रक्षाबंधनाचा सण घरातच राहून साजरा करण्याकडे अनेकांचा कल असण्याची शक्यताही आहे. एकमेकांपासून दूर राहूनही रक्षाबंधनाची गोडी टिकून राहावी यासाठी काही कंपन्यांनी डिजिटल स्वरूपात रक्षाबंधन साजरा करण्याचा नवा ट्रेंड ऑनलाइन बाजारात आणला आहे. डिजिटल राख्यांना ऑनलाइन बाजारांमध्ये मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे.

रक्षाबंधनला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून टाळेबंदीमुळे यंदा हा सण कसा साजरा करायचा प्रश्न एकमेकांपासून दूर राहणाऱ्या बहीण-भावांना पडला आहे. असे असले तरी सणासुदीचे दिवस जवळ येऊ लागल्याने ऑनलाइन बाजारांमधून तयारीचे प्रतििबब उमटण्यास सुरुवात झाली आहे. विविध ठिकाणी सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक भावांना आपल्या बहिणीपर्यंत पोहोचता येणार नाही, तर बहिणींनाही भावाला राखी बांधता येणार नाही. यावर पर्याय म्हणून काही कंपन्यांनी डिजिटल स्वरूपात रक्षाबंधन साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. भावांसाठी सीक्रेट फोटो राखी आणि क्यूआर कोड राखीचा समावेश आहे. या राख्या मोबाइलवर स्कॅन केल्यानंतर अनोखा संदेश आणि भावा-बहिणींचे छायाचित्र आणि चित्रफीत पाहायला मिळते. तर ई-भेटवस्तूंमध्ये बहीण-भावाचे नाते उलगडणारे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, चित्रफीत, मिनी व्हॉइस रेडिओ आणि डिजिटल भेट कार्ड यांचा समावेश आहे.  या राख्या आणि भेटवस्तू तयार करण्यासाठी बहीण किंवा भावाला या कंपन्यांच्या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर असलेल्या भेटवस्तू किंवा राखीची निवड करायची आहे. राखी किंवा भेटवस्तू निवडल्यानंतर कंपनीच्या ई-मेल आयडीवर त्या राखीमध्ये किंवा भेटवस्तूमध्ये समाविष्ट करणारे बहीण-भावांचे फोटो मेल करायचे आहेत. त्यानंतर भावाच्या पत्त्यावर राखी पाठविण्यासाठी योग्य पत्त्याची नोंदणी करायची आहे, तर भेटवस्तू पाठविण्यासाठी ज्या व्यक्तीला भेट द्यायची आहे, त्या व्यक्तीच्या ई-मेल आयडीची नोंद कंपनीकडे करायची आहे. या डिजिटल राख्या आणि भेटवस्तू ३५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. या नव्या राख्यांच्या ट्रेंडला समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत या डिजिटल राख्यांसाठी नोंदणीचे प्रमाण वाढल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

पर्यावरणपूरक राख्यांचाही समावेश

डिजिटल स्वरूपाच्या राख्यांसह पर्यावरणपूरक राख्यांची विक्रीही या कंपन्यांतर्फे करण्यात येत आहे. यामध्ये कागदाचा वापर करून तयार केलेल्या ‘तेराकोटा राखी’चा समावेश आहे. तसेच ‘सीड राखी’ म्हणजेच बियांपासून आणि मातीचा वापर करून तयार करण्यात आलेली राखीही उपलब्ध आहे. रक्षाबंधननंतर या राखीपासून सुंदर अशा छोटय़ा रोपाची लागवड करता येते. या पर्यावरण राख्या ५०० ते ६०० रुपये किमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.