दूरचित्रवाणीवरील ‘ब्लॅक आउट’च्या जाहिरातींचा प्रभावी परिणाम गेल्या वर्षअखेर आढळून आला असून, चार महानगरांमधील डिजिटायझेशनला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन दूरचित्रवाणीधारकांनी या मोहिमचा पहिला टप्पा यशस्वी करण्यात चांगले सहकार्य दिले आहे. आता दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ३८ शहरांमधील डिजिटायझेशन येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव उदयकुमार वर्मा यांनी व्यक्त केला.
मुंबईत शुक्रवारी प्रसारमाध्यमांच्या काही निवडक प्रतिनिधींशी बोलताना वर्मा यांनी डिजिटायझेशनच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली. दुसऱ्या टप्प्यातील डिजिटायझेशनसाठी सुमारे १.६० कोटी सेट टॉप बॉक्सेसची आवश्यकता आहे. परदेशी उत्पादकांकडूनच हे सेट टॉप बॉक्स आयात केले जात असले तरी भारतीय उत्पादकांनाही संधी मिळावी यासाठी माहिती प्रसारण मंत्रालय प्रयत्नशील आहे. भारतीय उत्पादकांनी वाजवी किमतीत दर्जेदार सेट टॉप बॉक्सचा पुरवठा केला, तर दुसऱ्या टप्प्यात भारतीय उत्पादकांना ही बाजारपेठ उपलब्ध राहील, असे वर्मा म्हणाले. मात्र, देशाच्या करविषयक धोरणामुळे भारतीय उत्पादकांना आठ टक्के जास्त कर द्यावा लागत असल्याने भारतीय बनावटीचे सेट टॉप बॉक्स अधिक महाग असून, यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अर्थखात्याशी चर्चा सुरू असल्याने यातून मार्ग निघू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader