व्यापमं घोटाळ्यावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शिवराज यांनी पिंडदान योजना सुरू करावी, असा खोचक सल्ला दिग्विजय यांनी देऊ केला आहे. व्यापमं घोटाळा प्रकरणात एकमागोमाग होणारे मृत्यू पाहता मामांनी (शिवराज यांना राज्यात याच नावाने संबोधले जाते) कन्यादान योजनेसोबतच पिंडदान योजनाही सुरू करायला हवी, असे ट्विट दिग्विजय यांनी केले आहे.

दरम्यान, गूढ मृत्यूंच्या मालिकेमुळे देशभरात चर्चेत असलेल्या व्यापमं घोटाळ्यावरून देशात वातावरण चांगले तापले आहे. या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर या घोटाळ्यामध्ये आतापर्यंत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्याचाही तपास सीबीआयने करावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दोनच दिवसांपूर्वी शिवराजसिंह चौहान यांनीही या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीसाठी तेथील उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

Story img Loader