ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची धनादेश न वटण्याच्या १८ वर्षे जुन्या प्रकरणातून गिरगाव महानगर दंडाधिकाऱ्यांनी निर्दोष सुटका केली. धनादेश न वटण्याप्रकरणी मानद संचालकाला दोषी ठरवता येत नाही, असे नमूद करत न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले.

दिलीप कुमार हे ‘जीके’ या कंपनीचे मानद संचालक होते. त्यामुळे कंपनीच्या दैनंदिन कामकाजाशी त्यांचा थेट संबंध नव्हता. त्यामुळे त्यांना या प्रकरणी दोषी ठरवता येऊ शकत नाही, असेही न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवताना नमूद केले. दिलीप कुमार यांच्यासह विमल कुमार राठी यांनाही न्यायालयाने निर्दोष ठरवले. तर याच प्रकरणातील एस. सेतूरमण आणि गोपाळकृष्ण राठी यांना मात्र न्यायालयाने दोषी ठरवले. मात्र दोन्ही पक्ष न्यायालयात हजर होते.

दरम्यान, दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी या प्रकरणाबाबत ट्विट केले होते. त्यात त्यांनी दिलीप कुमार यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करतानाच  ९४व्या वर्षी ते न्यायालयात हजर झाले तर तब्येतीवर परिणाम होऊ शकतो, असे म्हटले होते. ‘डेक्कन सिमेंट्स’ या कंपनीने हे खटला दाखल केला होता. १९९८ साली दिलीप कुमार हे जीके एक्झिम इंडिया लि. या कंपनीचे मानद संचालक होते.