ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज नाही मात्र त्यांच्या काही चाचण्या अद्याप बाकी असून त्यासाठी त्यांना दोन दिवस रु ग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती लिलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी दिली.
दिलीपकुमार यांना शनिवारी पहाटे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९३ वर्षीय दिलीप कुमार यांची प्रकृती त्यांना रुग्णालयात आणल्यापासून स्थिर आहे. त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांबरोबरही सल्लामसलत केली असून आणखी काही चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यांची प्रकृती आता चांगली असून ते जेवणही घेत आहेत. मात्र त्यांचे वयोमान जास्त असल्याने आणखी दोन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनीही ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या आजारपणाची माहिती दिली. दिलीप कुमार यांना खूप ताप आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवावे लागले, असे सायरा बानो यांनी म्हटले आहे.