ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार मूत्रपिंडाच्या समस्येमुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवलंय. गुरुवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाली होती. मात्र संध्याकाळी डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पुढील आणखी काही तासांसाठी अतिदक्षता विभागातच ठेवण्यात येणार आहे.
लिलावतीच्या अतिदक्षता विभागात दिलीप कुमार यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करतेय. मूत्रपिंडासंबंधी समस्या असून त्यासंबंधीचे उपचार त्यांच्यावर करण्यात येत आहेत. डॉक्टर जलील पारकर आणि किडणी स्पेशलिस्ट डॉक्टर नितीन गोखले यांच्यासोबतच इतरही काही डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती मिळतेय.
बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांना गेल्या काही दिवसांपासून ताप होता अशीही माहिती समोर येतेय. दिलीप कुमार यांची भाची आणि अभिनेत्री सायशाची आई शाहीनने ट्विट करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. दिलीप कुमार यांचे चाहतेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. याआधी डिसेंबरमध्ये ९४ वर्षीय दिलीप कुमार यांना लिलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. पायाला सूज आल्याने त्यांना त्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.