महाविकासआघाडीतील खदखद वेळोवेळी बाहेर आलीय. काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसमधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट उत्तर देत मोठं वक्तव्य केलंय.
दिलीप वळसे म्हणाले, “या प्रकरणात काँग्रेस नेत्यांची नाराजी समोर आलीय, परंतु त्यासंदर्भात मंत्रिमंडळात मुख्य सचिवांना एक अहवाल देण्यास सांगण्यात आलं. तो अहवाल आल्यानंतरच या विषयावर बोलणं उचित होईल.” आता मुख्य सचिव काँग्रेस नेत्यांवरील गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणांवर काय अहवाल देतात आणि त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
“आम्ही परस्परांना विश्वासात घेऊनच सगळे निर्णय घेतो”
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेवर बोलताना दिलीप वळसे म्हणाले, “या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत आधीच खुलासा केला आहे. अशाप्रकारची कुठलीही नाराजी नाही. नाराजी असण्याचा प्रश्न नाही. आम्ही परस्परांना विश्वासात घेऊनच सगळे निर्णय घेत असतो.”
“संजय राऊत यांची भावना बरोबर आहे. त्याबाबत आमच्या विभागाकडून काही कमतरता होत असतील जरूर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू,” असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
संजय राऊत म्हणाले होते, “सतीश उकेंवर झालेल्या कारवाईवर काही म्हणणं नाही पण त्यात केद्रीय तपास यंत्रणांचा हस्तेक्षप आल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राज्याच्या पोलिसांना योग्य सूचना, मार्गदर्शन मिळालं तर काम होऊ शकेल. गृहखात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.”
हेही वाचा : “स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर दिलीप वळसे म्हणाले, “त्यांची भावना…”
“केंद्रीय तपास यंत्रणा घुसत आहेत हे गृहखात्यावरील आक्रमण आहे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था, तपास यंत्रणा ज्यांच्या अख्त्यारित आहे त्यांनी यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कोणी ‘आहिस्ते कदम’ भूमिका घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. गृहखात्याला दमदार पावलं टाकावी लागतील, अन्यथा तुमच्यासाठी रोज एक नवा खड्डा खणाल,” असा इशारा संजय राऊतांनी दिला होता.