ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या आईचे बेट्टी कपाडिया यांचे आज पहाटे ४ च्या सुमारास निधन झाले. मुंबईतील एका रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार या दोघांना हिंदुजा रुग्णालयाबाहेर पाहण्यात आले होते. मात्र तेव्हापासून डिंपल कपाडिया रुग्णालयात भरती असल्याची चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याचीही अफवा पसरली होती. मात्र या साऱ्यावर डिंपल यांनी खुलासा करत मी ठिक असून माझी आई रुग्णालयात भरती असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर अखेर बेट्टी यांचं निधन झालं.
डिंपल यांचं सांत्वन करण्यासाठी सकाळपासूनच बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या घरी आल्याचं दिसून आलं. सोबतच सनी देओल, ऋषी कपूर याच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी बेट्टी यांना आदरांजलीही वाहिली.
दरम्यान, अलिकडेच बेट्टी कपाडिया यांचा ८० वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. शिलिम्ब येथे बेट्टी यांच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. या क्षणाचे काही फोटोदेखील अक्षयकुमारने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र बेट्टी यांच्या निधनाची माहिती कळताच संपूर्ण बॉलिवूड हळहळल्याचं पाहायला मिळालं.