पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दिंडोशी उड्डाणपुलावर पडलेला खड्डा बुजविण्यासाठी दुरुस्तीचे काम मंगळवारी पहाटेपासून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे बोरिवली ते अंधेरी जाणाऱ्या वाहनांसाठी दिंडोशी उड्डाणपूल मंगळवार पहाटे चार वाजल्यापासून बुधवार पहाटे तीन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर दिंडोशी उड्डाणपुलावर २ ऑक्टोबरला आठ बाय चार मीटरचा महाकाय खड्डा पडला होता. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत होती. त्याच्या दुरुस्तीचे काम मंगळवार पहाटे ४.०० पासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिंडोशी उड्डाणपुलावरून बोरिवलीकडून अंधेरीकडे जाणारी सर्व वाहतूक चोवीस तासांसाठी बंद करण्यात आली आहे. परंतु अंधेरीकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना उत्तर वाहिनीवरील दोन पदरी मार्ग मोकळे करून देण्यात आले आहेत. अंधेरीकडे जाणाऱ्या वाहनांनी शक्यतो लिंक रोडचा वापर करावा असे आवाहन दिंडोशी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर दळवी यांनी केले आहे.

Story img Loader