नारायण राणे यांचे कोकणातील कट्टर विरोधक व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राणे यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा रविवारी केली.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राणे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने केसरकर वादग्रस्त ठरले होते. राणे यांच्या पुत्राचे काम करणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. याबद्दल राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारला होता. नारायण राणे यांच्या विरोधात लढण्याकरिता केसरकर यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे. आमदारकीचा आठवडाभरात राजीनामा देणार असून, ऑगस्टमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे केसरकर यांनी जाहीर केले. नारायण राणे यांना आपला वैयक्तिक विरोध नाही, पण राणे यांच्यासारख्या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्याकरिताच आपण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे गणित बिघडले
सावंतवाडीचे आमदार केसरकर यांना राणे यांच्या विरोधात लढण्याकरिता राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने वेळोवेळी ताकद दिली. जिल्ह्यातील पक्षसंघटनेत महत्त्व वाढल्यावर केसरकर यांनी पक्षांतर्गत विरोधकांना चाप लावण्यास सुरुवात केली. यातूनच राणे यांच्या विरोधात खंबीरपणे लढणारे आणि कणकवलीमध्ये राणे यांचा निभाव लागू न देणारे संदेश पारकर हे नाराज झाले. केसरकर आणि पारकर यांच्यातील शीतयुद्धात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केसरकर यांना झुकते माप दिले. यामुळे वैतागून पारकर यांनी आपले पारंपारिक विरोधक राणे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. केसरकर यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना दुखावले होते. पारकर काँग्रेसवासी झाले तर केसरकर आता शिवसेनेत जात आहेत. कोकणात व विशेषत: सिंधुदुर्गमध्ये ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या राष्ट्रवादीचे सारेच गणित बिघडले आहे.
भास्कर जाधव यांना धक्का, कदम पुन्हा राष्ट्रवादीत
कामगारमंत्री भास्कर जाधव यांच्याशी असलेल्या वैमनस्यातून ते प्रदेशाध्यक्ष होताच राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी रविवारी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. कदम यांनी रायगड मतदारसंघातून तटकरे यांच्या विरोधात शेकापचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.
केसरकर यांचा राष्ट्रवादीला रामराम
नारायण राणे यांचे कोकणातील कट्टर विरोधक व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राणे यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा रविवारी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-07-2014 at 01:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dipak keskar left ncp may join shiv sena