मुंबई : आजच्या जगात प्रामाणिकपणा, सत्य बोलणे हे अधिक अवघड होत चालले आहे. सद्य:स्थितीत खरे बोलता येत नसेल तर खोटे बोलण्यापेक्षा मी माझ्या चित्रपटातून व्यक्त होतो, असे स्पष्ट मत दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात ते बोलत होते. अभिनेते, दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भडक, हिंसक, नकारात्मक व्यक्तिरेखांनी भरलेल्या चित्रपटांचा लेखक, निर्माता, दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या अनुराग कश्यप यांच्या कारकिर्दीतील विविध रंग शनिवारी ‘लोकसत्ता गप्पा’च्या कार्यक्रमातून उलगडले. वरळीतील नेहरू सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलावंत, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शास्त्रज्ञ होण्याची मनिषा बाळगणाऱ्या अनुराग कश्यप यांचा आधी रंगभूमी आणि मग सिनेमापर्यंत झालेला प्रवास यावर मकरंद देशपांडे यांनी त्यांना बोलते केले. ‘ब्लॅक फ्रायडे’ हा अनुराग कश्यप यांचा पहिला चित्रपट आता अभिजात चित्रपटांच्या यादीत गणला जातो. मुंबई बॉम्बस्फोटांवर आधारित या चित्रपटात वास्तव घटना, व्यक्तींची नावे असे चित्रण करण्यात आले होते. हे धाडस कुठून आले? या प्रश्नावर अनुराग म्हणाले, ‘‘ ब्लॅक फ्रायडे हा पहिलाच चित्रपट अत्यंत प्रामाणिकपणे आणि निरागसपणे केला होता. त्यावेळी चित्रपटात अशा पध्दतीने खऱ्या व्यक्तिरेखांची नावे, संदर्भ द्यायचे नसतात याची कल्पनाच नव्हती.’’ आता बदलती राजकीय-सामाजिक परिस्थिती लक्षात घेता खरे बोलणे अवघड होऊन बसले आहे, अशी कबुली त्यांनी दिली. काही प्रमाणात समाजमाध्यमांचा अतिरेकही याला जबाबदार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मीही या समाजमाध्यमांच्या आहारी गेलो होतो, माझ्या विधानांवरून उठलेल्या वादविवादांचा परिणाम घरच्यांवर विशेषत: माझ्या मुलीवर होऊ लागल्याने मी समाजमाध्यमांपासून दूर झालो, असेही त्यांनी मोकळेपणाने सांगितले.

माझे चित्रपट अतिवास्तववादी असल्याचे म्हटले जाते, मात्र जगभरातील चित्रपट पाहिले तर ते खूप सौम्य भासतील. आपल्याकडच्या प्रेक्षकांना ‘गुलाबी’ हिंदी चित्रपट पाहण्याची सवय असल्याने माझे चित्रपट त्यांना भडक आणि अतिवास्तवादी वाटतात, असे मत अनुराग यांनी व्यक्त केले. कलाकार हे सर्वसाधारणपणे राजकीयदृष्टय़ा सोईने वागतात, यांचेही बरोबर आणि त्यांचेही चूक नाही, असे बोलणाऱ्यांच्या मांदियाळीत जे अयोग्य वाटते ते स्पष्टपणे बोलणारा अनुराग कश्यपसारखा कलावंत ‘लोकसत्ता गप्पा’च्या व्यासपीठावर येणे या उपक्रमाची उंची वाढवणारे आहे, अशी भावना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक मांडताना व्यक्त केली. ‘ब्लॅक फ्रायडे’ या पहिल्या चित्रपटापासून ते त्याच्या ‘केनेडी’ या आगामी चित्रपटापर्यंतच्या वाटचालीतील अनेक आठवणी, किस्से सांगत अनुराग कश्यप यांनी चित्रपटांविषयीचे आपले विचार उलगडून सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director anurag kashyap in conversation on loksatta gappa programme amy