‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या निमित्ताने लखनऊमध्ये रंगल्या गप्पा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्य आणि एकूणच शिवकालीन काळ ‘शिवराज अष्टक’ या मराठी चित्रपट शृंखलेच्या माध्यमातून मांडणारे प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरात पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोमवारी लखनऊ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीत उभयतांनी इतिहास, कला, संस्कृती आदी विषयांवर संवाद साधला.

संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट १८ एप्रिलपासून प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथे भेट झाली.

यावेळी अभिनेता अजय पूरकर, आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ देखील उपस्थित होते. या भेटीत योगी आदित्यनाथ यांनी सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्याली. तसेच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाविषयी जाणून घेत योगी आदित्यनाथ यांनी चित्रपटाच्या संपूर्ण चमूला शुभेच्छा दिल्या.

तर दिग्पाल लांजेकर यांनी योगी आदित्यनाथ यांना ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे खास निमंत्रण दिले. ‘नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा अलौकिक संबंध या सगळ्या क्रांतीत या चारही भावंडांच्या योगदानावर योगी आदित्यनाथ यांनी चर्चा केली. एकंदरीत त्यांचा संत साहित्य आणि धर्म-संस्कृती याविषयीचा गाढा अभ्यास थक्क करणारा होता’, असे दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले.