बेडेकर लोणची, मसाले आणि पापड महाराष्ट्रात प्रचंड प्रसिद्ध आहेत. या खाद्य व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले व्ही. पी. बेडेकर आणि सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचं शुक्रवारी निधन झालं. मागच्या महिनाभरापासून ते आजारी होते. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील बेडेकर सदन या ठिकाणाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अतुल बेडेकर यांच्या निधनाचं वृत्त समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना आदरांजली वाहिली आहे.
अजित पवार यांनी अतुल बेडेकर यांना वाहिली आदरांजली
व्ही. पी. बेडेकर आणि सन्स उद्योग समूहाचे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनानं उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशात ठळक करणारे प्रयोगशील उद्योजक आपण गमावले आहेत.
“लोणची, चटणी आणि विविध प्रकारच्या मसाल्यांच्या व्यवसायात उत्पादनाचा दर्जा, ग्राहकांची अभिरुची जपतानाच त्यात काळानुरुप बदल करून अतुल बेडेकर यांनी बेडेकर ब्रँडला वेगळे स्थान निर्माण करून दिले. शंभर वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या पारंपरिक स्वरुपाच्या व्यवसायास आपल्या प्रयोगशीलतेनं जागतिक ओळख निर्माण करून दिली. आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशात ठळक करणाऱ्या उद्योग समूहांपैकी असणाऱ्या बेडेकर उद्योग समूहाची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. त्यांच्या निधनानं मराठी उद्योग जगतातील प्रयोगशील व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. बेडेकर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
व्ही.पी.बेडेकर अँड सन्स उद्योगाचे संचालक अतुल बेडेकर यांचे दुःखद निधन झाले. लोणची, मसाले, चटणी यांसारख्या पारंपरिक मराठमोळ्या खाद्यपदार्थ व्यवसायातील अतुल बेडेकर हे प्रतिष्ठित व्यक्तीमत्व होते.
त्यांच्या निधनाने मराठी उद्योग क्षेत्रातील एक महत्वपूर्ण तारा निखळला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच बेडेकर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
बेडेकर लोणची, पापड आणि मसाल्यांचा ब्रँड आज जागतिक पातळीवरचा एक ब्रांड झाला आहे. दर्जेदार उत्पादने, ग्राहकांच्या अभिरुचीची समज, अपेक्षेनुसार बदल आणि काळाच्या सुसंगतपणे व्यवसाय वाढवण्याचे अनुभवी कौशल्य यामुळे बेडेकर यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
मसाले, लोणचे, पापड, रेडी मिक्स इत्यादी बनवणारा बेडेकर समूह दिवंगत व्हीपी बेडेकर यांनी सुरू केला होता. १९१० मध्ये गिरगावमध्ये किराणा दुकान म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला पुढे तो वाढला. १०० वर्षांहून अधिक काळ लोणची, पापड आणि मसाले या क्षेत्रात बेडेकर कार्यरत आहेत.