मुंबई : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांना आवर्जून गर्दी करणारे आणि त्याविषयी भरभरून बोलणारे मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांबाबत मात्र उदासीन असतात, असे निरीक्षण अनेकदा चित्रपटकर्मींकडून नोंदवले जाते. मराठीत दाक्षिणात्य चित्रपटांच्या दर्जाचे चित्रपटच तयार होत नाहीत, बायकांचे रडके कृत्रिम सिनेमे काढतात, तरुण फ्रेश लव्हस्टोरी कधीच नसते, तेच तेच जून चेहरे दिसतात, प्रत्येक चित्रपटात संदेश देण्याचा अट्टहास कशाला? अशा नानाविध तक्रारी करणाऱ्या प्रेक्षकांना प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी समाजमाध्यमांवरून कानपिचक्या दिल्या आहेत.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी नुकताच गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘विषय हार्ड’ हा नवाकोरा मराठी चित्रपट पाहिला. लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता सगळ्याच आघाड्यांवर नवोदित असलेल्या कोल्हापूरच्या सुमीत पाटीलचा हा पहिलाच चित्रपट आहे. करोना काळातील घनघोर टाळेबंदीत प्रेम टिकवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या प्रेमी युगुलांची कथा या चित्रपटात रंगवण्यात आली आहे. अभिनेत्री पर्ण पेठे वगळता चित्रपटातील जवळपास सगळेच चेहरे नवीन आहेत. एकीकडे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असूनही वेगळ्या पटकथेवरचा सिनेमा काढण्यासाठी निर्मात्यांची भेट घेत दारोदारी फिरावे लागत असताना कोल्हापूरच्या तरुणांनी स्वबळावर इतक्या चांगल्या चित्रपटाची निर्मिती करावी हे कौतुकास्पद असल्याची भावना सुकथनकर यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
‘हातातली (मला तरी वेगळी वाटणारी) माझी स्क्रिप्ट्स घेऊन निर्मात्यांची वेळ मागत फिरत असतो. आणि इथे ही कोल्हापूरची पोरे टेक्निकली स्मार्ट, निर्मितीमूल्य व्यवस्थित असलेला, प्रत्येक कलाकार युनिक असलेला, मुख्य म्हणजे मनोरंजक कचकचीत मराठी चित्रपट (पुन्या-मुंबई छाप नसलेला) स्वबळावर काढून मोकळी होतात’ अशा शब्दांत या चित्रपटातील कलाकारांचे आणि सुमीत पाटीलचे कौतुक करतानाच आता रडकेपणाने चर्चा करायची का उठून बघायला जायचे ते तुम्ही ठरवा, असा सल्ला त्यांनी प्रेक्षकांना दिला आहे.
हेही वाचा – दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावरच चरित्रपट होऊ शकतो – विकी कौशल
आणि मग आपण तो ओटीटीवर चवीनं पाहू…
मराठी चित्रपट जगवण्याविषयी बोलायला सुरुवात केली की त्याची चेष्टा होते, असे सांगत ‘विषय हार्ड’सारखा फ्रेश मराठी चित्रपट आता चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाहीत तर उद्या दुलकर सलमानला घेऊन कुणी याचा मल्याळममध्ये रिमेक करेल. त्यात फहाद फाजिलही प्रेमाने सहाय्यक म्हणून काम करेल, तिथले प्रेक्षक तो हिट करतील… आणि मग आपण मराठी प्रेक्षक तो ओटीटीवर चवीने पाहून मराठीत असले हलकेफुलके इनोव्हेटिव्ह बनतच नाय, असे म्हणायला मोकळे होऊ…, अशा शब्दांत सुकथनकर यांनी टीका केली. ही पोस्ट चित्रपटाचे तिकीट काढून पाहून आल्यावर लिहिली आहे, अशी टिप्पणीही त्यांनी पुढे जोडली आहे.