मुंबई : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत (आरबीएसके) शालेय विद्यार्थ्यांवर विविध उपचार मोफत केले जातात. मात्र, अनेक वेळा या रुग्णांना उपचारासाठी अन्य विभागात पाठवण्यात येते. यामुळे रुग्ण व त्याच्या पालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेता आरोग्य सेवा संचालनालयाने ‘आरबीएसके’अंतर्गत करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया या रुग्ण राहत असलेल्या विभागातच करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा चिकित्सकांना दिल्या आहेत. यामुळे रुग्ण व त्यांच्या पालकांचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
‘आरबीएसके’अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांवर योग्य, वेळेत आणि मोफत उपचार करण्यात येतात. यामध्ये कॉक्विलियर इम्प्लांट, हृदयरोग, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, सुघटनशल्य शस्त्रक्रिया, नेत्ररोग चिकित्सा, बालरोग शस्त्रक्रिया, दुंभगलेल्या ओठांची शस्त्रक्रिया, जन्मजात दोष, आजार, अपंगत्व, शारीरिक व मानसिक विकासामध्ये वाढ होण्यास विलंब होणे अशा जवळपास १०४ आजारांवर उपचार करण्यात येतात. हे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्र जन आरोग्य योजनेंतर्गत, तसेच आरबीएसके योजनेंतर्गत संलग्न रुग्णालयांमध्ये मोफत करण्यात येतात. त्यानुसार विभागनिहाय जिल्ह्यातील रुग्णालयांमध्येच आरबीएसके संबंधित आजारावर शस्त्रक्रिया करण्यात येतात. त्यानुसार सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील रुग्णांना पुण्यामध्ये, तर नागपूर विभागातील रुग्णांना नागपूर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात पाठवणे अपेक्षित असते. मात्र काही जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णांना थेट मुंबईतील रुग्णालयांमध्ये पाठवतात. त्यामुळे या लहान मुलांच्या पालकांना मुंबईतील प्रवासापासून निवासापर्यंत सर्व व्यवस्था करावी लागते. परिणामी त्यांची गैरसोय होऊन त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. ही बाब आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्ण राहत असलेल्या विभागातील जिल्ह्यांमध्येच किंवा लगतच्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा चिकित्सकांना दिल्या. तसेच त्या विभागात किंवा जिल्ह्यातील नोंदणीकृत रुग्णालयात उपचाराची सुविधा नसल्यास त्यांना अन्य जिल्हा किंवा विभागात संदर्भित करण्यात यावे. जेणेकरून रुग्ण आणि यंत्रणेच्या वेळेची आणि अनुदानाची बचत होईल, असेही संचालनालाकडून स्पष्ट करण्यात आले.
दक्षता घ्यावी – डॉ. अंबाडेकर
‘आरबीएसके’अंतर्गत उपचार घेणारे रुग्ण हे शालेय विद्यार्थी असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वृध्दीसाठी त्यांच्यावर वेळेत उपचार होणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी कोणतेही उपचार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेश आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिले आहेत.
दोन्ही कार्यक्रमांतर्गत नोंदणी करावी
‘एमजेपीजेवाय’ आणि ‘पीएमजेवाय’ संलग्न रुग्णालये ‘आरबीएसके’ नोंदणीकृत नसल्यास किंवा ‘आरबीएसके’ रुग्णालये ही ‘एमजेपीजेवाय’ आणि ‘पीएमजेवाय’मध्ये नोंदणीकृत नसल्यास त्यांना दोन्ही कार्यक्रमांतर्गत नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे, जेणेकरून जास्तीत जास्त रुग्णांना नजिकच्या रुग्णालयात उपचार उपलब्ध होऊ शकतील, असेही आदेश आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिले आहेत.