आपत्ती काळात विविध यंत्रणांशी समन्वय साधून आपत्तीग्रस्तांच्या मदतकार्यासाठी धावपळ करणाऱ्या पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला आधुनिकतेची जोड देऊन अधिक सक्षम आणि गतिमान करण्यात येणार असून त्याबाबतचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच वाढता व्याप लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन विभाग पालिका मुख्यालयातील मोठय़ा जागेत हलविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभाग मुख्यालयाच्या तळघरात आहे. या विभागाच्या कामकाजाचा आढावा आयुक्तांनी अलीकडेच घेतला. अपुऱ्या जागेमुळे आणीबाणीच्या वेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा विभाग मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील विस्तृत जागेत हलविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. कामाचा वाढता व्याप, मदतकार्ये, व्हिडीओ वॉल, समादेशन, नियंत्रण सॉफ्टवेअरचा प्रभावी उपयोग करण्यात येणार आहे. परळ येथील कल्पतरू इमारतीत शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र आणि मुख्य नियंत्रण कक्षाचे बॅकअप सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यासाठी पदनिर्मिती करण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

Story img Loader