मुंबई : वकील गुणरतन सदावर्ते यांच्यावर तक्रारीद्वारे करण्यात आलेले आरोप महाराष्ट्र गोवा वकील संघटनेला गंभीर वाटत असले, तरी आपल्याला ते गंभीर वाटत नाहीत, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली. तसेच सदावर्ते यांच्याविरोधातील दोनपैकी एक तक्रार फेटाळून लावण्याचे आदेश संघटनेला दिले. संघटना ही तक्रार फेटाळून लावणार नसेल, तर आम्ही ती फेटाळून लावू, असेही न्यायालयाने संघटनेला बजावले.
माध्यमांसमोर बेजबाबदार विधाने केल्याप्रकरणी आणि सार्वजनिक ठिकाणी वकिलांचा पांढरा बँड परिधान करून वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य वकील परिषदेने सुरू केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईविरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन सदावर्ते यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केल्यावरून न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र आणि गोवा वकील संघटनेला धारेवर धरले. समाजमाध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या चित्रफितीचा न्यायालयाने या वेळी दाखला दिला.