न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १८७८ मध्ये झालेले ‘ग्रंथकार संमेलन’ आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने ओळखले जाते. रानडे नेमस्त आणि उदारमतवादी म्हणून ओळखले जात. कोणताही प्रश्न समन्वय आणि सामोपचाराने सोडवावा, अशी त्यांची भूमिका असायची. संमेलनातील आजचे वाद पाहता संमेलनाचे मूळ संस्थापक रानडे यांच्या त्या भूमिकेचा आता सगळ्यांनाच  विसर पडला आहे, अशी खंत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
या वादावर तोडगा काढण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी आणि राजकारणी मंडळींनी एकत्र येऊन सामोपचाराने मार्ग काढावा, असे द. भि. म्हणाले.
या सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी आणि ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी दोन्ही बाजूचे वाद तडजोड आणि सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न करावा. तडजोडीमध्ये दोन्ही पक्षांना आपल्या भूमिकेपासून काही पावले मागे जावे लागते तर सामोपचारात दोन्ही बाजूना काहीतरी अधिक मिळत असते, असे सांगून द.भि. म्हणाले की, दडपशाही, हिंसाचार याला आपण अजिबात थरा देता कामा नये. त्यातून केवळ अराजकच निर्माण होईल. यात सत्ताधारी आणि धनदांडगे तसेच उच्चपदस्थांचे काहीही नुकसान होणार नाही. सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल लोकच यात नाहक भरडले जातील.
हे सर्व करूनही तडजोड किंवा सामोपचाराने काही मार्ग निघाला नाही तरी कोणीही हिंसक मार्गाने आपला निषेध व्यक्त करू नये. संमेलनस्थळी किंवा मुख्य प्रवेशद्वारावर शांततने आपला निषेध व्यक्त करावा. आपले म्हणणे मांडावे, असे आवाहनही द. भि. कुलकर्णी यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील नागरिक विवेकी आहेत. सगळ्यांनी विवेक आणि तारतम्याने विचार केला तर संमेलन अजूनही सुरळीतपणे पार पडू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.