शेअर गुंतवणूक यापूर्वी एक प्रकारचा सट्टा मानला गेला होता; पण शिस्त, नियोजन आणि अभ्यास यांच्या बळावर शेअर गुंतवणुकीमध्ये यश प्राप्त करता येऊ शकते. या क्षेत्रात मुळात आवड असणं आवश्यक असून त्याची सुरुवात आपल्या घरापासून अर्थात लहान मुलापासून झाली पाहिजे. शेअर बाजारात गुजराती, मारवाडी, पारशी समाजाचे अधिराज्य आहे. त्यामुळे या ठिकाणी मराठी टक्का कमी असून शेअर गुंतवणुकीचे बाळकडू आताच्या पिढीला मिळाल्यास शेअर बाजारात यांनतर मराठी टक्का वाढू शकेल, असा विश्वास अर्थ वृत्तान्तचे स्तंभलेखक अजय वाळिंबे यांनी ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ कार्यक्रमात व्यक्त केला. शेअर बाजारातील गुंतवणूक ही प्रेरणा देणारी असली तरी ती भावनिक असू नये, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. शेअर बाजारात जोपर्यंत स्वत:चे पैसे गुंतवले जात नाहीत तोपर्यंत आवड निर्माण हेाणार नाही. शेअरमध्ये गुंतवणूाक करताना स्वत:वर बंधन घालून घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. शाळेत ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे रिपोर्ट कार्ड पाहिले जाते त्याचप्रमाणे गुंतवणूकदाराचे सिबिल रिपोर्ट कार्ड आहे. कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना देशातील कोणतीही वित्तपुरवठा संस्था सिबिल रिपोर्ट्स आणि स्कोर पाहिल्याशिवाय कर्ज देत नाही. सिबिल रिपोर्टमधल्या चुका आपण सुधारू शकतो. यासाठी झालेल्या चुकांची भरपाई करून सिबिल हिस्टरी चांगली करता येते. ज्याप्रमाणे आपण वार्षिक आरोग्य तपासणी करतो त्याचप्रमाणे सिबिल रिपोर्टची तपासणी दर सहा महिन्याला करणे आवश्यक असल्याचे मत सिबिलच्या ग्राहक संबंध विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा हर्षला चांदोरकर यांनी व्यक्त केले. वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था किंवा संबंधित ग्राहक यांच्याशिवाय कोणालाही सिबिल रिपोर्ट दिला जात नाही. सिबिल रिपोर्ट हा आपली बाजारातील पत भक्कम करणारा चांगला पर्याय आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी रोहन टिल्लू यांनी केले.
लोकसत्ताच्या वतीने शनिवारी प्रकाशित करण्यात आलेल्या अर्थब्रह्म या वार्षिक विशेषांकाचे कौतुक तज्ज्ञांनी केले. अर्थब्रह्म देखणा आणि अतिशय साध्या-सोप्या-सरळ शब्दांत मांडण्यात आलेला आहे. आर्थिक साक्षरता येण्यासाठी अर्थब्रह्म हा प्रत्येक गुंतवणूकदाराने वाचायला हवा, असे मत वाळिंबे यांनी व्यक्त केले; तर अर्थब्रह्मसाठी परिश्रम घेतलेल्या टीम लोकसत्ताचे कौतुक गोखले यांनी केले.
‘सावध रहायला हवे’
देशात सध्या रोख रक्कम घेऊन गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवले जात आहे. त्यासाठी जास्त परतावा देण्याची हमीदेखील दिली जाते. रोखीने घेतलेल्या पैशाचा कोणताही पुरावा आपल्याकडे नसल्याने त्यात फसवणूक होण्याची शक्यता आहे, असे वाळिंबे यांनी सांगितले; तर ज्या गुंतवणुकीमध्ये अधिक परतावा मिळतो त्या
गुंतवणुकीकडे संशयाने बघण्याची आवश्यकता असल्याचे मतही गोखले यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रमाणे आपण वार्षिक आरोग्य तपासणी करतो त्याचप्रमाणे सिबिल रिपोर्टची तपासणी दर सहा महिन्याला करणे आवश्यक आहे.
हर्षला चांदोरकर , सिबिल ग्राहक संबंध विभागाच्या उपाध्यक्ष

   

Story img Loader