मुंबई : परीक्षा आणि इतर महत्त्वाचे शैक्षणिक कामकाज सुरू असताना जवळपास दोन हजारांहून अधिक शिक्षकांना मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (‘बीएलओ’) पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
पालिका क्षेत्रातील अनुदानित आणि पालिका शाळांतील शेकडो शिक्षकांना ‘बीएलओ’ म्हणून रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी शिक्षक संघटनांनी या आदेशाला विरोध करीत ‘बीएलओ’चे काम करण्यास नकार दिला आहे. पालिकेच्या शिक्षण खात्यातील एकूण दोन हजार कर्मचारी ‘बीएलओ’ म्हणून उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. परंतु उपशिक्षणाधिकाऱ्यांनी १६ ऑगस्ट रोजी आढावा घेतला. त्यानंतर कमी कर्मचारी निवडणूक कार्यालयायात रूजू झाल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात वरिष्ठांनीही नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा…प्रकल्पबाधितांसाठी यापुढे घरांचे वितरण ॲानलाईन! दोन लाख घरांचे शासनाकडून लक्ष्य
या वर्षी १५ दिवस आधीच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात दहावीची परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे अध्यापन व तयारीचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. त्यामुळे ‘बीएलओ’चे काम शिक्षकांसाठी सक्तीचे करून विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये. शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत सक्ती करू नये. – शिवनाथ दराडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई कार्यवाह