मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथील ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या सीईसी परिसरात ‘जंपिंग स्पायडर’ म्हणजे उडय़ा मारणाऱ्या कोळय़ाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. संशोधक प्रणव जोशी आणि ऋषिकेश त्रिपाठी यांनी हा शोध लावला आहे. तसेच याबद्दल माहिती ‘आथ्रोपॉड सिलेक्टा’ या आंतरराष्ट्रीय ‘पीएर रिव्ह्यूड जर्नल’मध्ये नुकतीच प्रकाशित झाली.
प्रणव जोशी याला ही प्रजाती जून २०२१ मध्ये प्रथम मुंबईतील गोरेगावच्या साईसी केंद्राच्या आवारात आढळली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये या प्रजातीचे नर आणि मादी या दोघांना संबंधित भागातून संशोधनासाठी प्रयोगशाळेत नेण्यात आले. ‘बीएनएचएस’च्या आवारातील ओहोळालगतच्या खडकांवर ही प्रजाती सापडली. या प्रजातीचे ‘जीन्स हसारियस’ असून, मुंबईत आढळल्याने या प्रजातीला ‘हसारियस मुंबई’ नाव देण्यात आले आहे.
संशोधनासाठी या प्रजातीला केरळामधील ‘क्राइस्ट युनिव्हर्सिटी’तील प्रयोगशाळेत नेण्यात आले होते. ही वेगळी प्रजाती असल्याचे पडताळून पाहण्यासाठी नर आणि मादी कोळय़ांचे विच्छेदन करून सूक्ष्मदर्शिकेखाली निरीक्षण करण्यात आले. याला शास्त्रीय भाषेत ‘जेनेटालिया डायसेक्शन’ म्हणतात. यानंतर काढलेले छायाचित्र, सूक्ष्मदर्शिकेतून काढलेले छायाचित्र इतर कोळय़ांच्या प्रजातींशी जुळवून पाहिल्यानंतर ती पूर्ण नवी प्रजाती असल्याची खात्री झाली.