खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या मॉल्सना पोलिसांची तंबी
आवडत्या हॉटेलमधून अन्नपदार्थ झटपट घरपोच आणून देणाऱ्या स्वीगी, झोमॅटो अशा खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रकार रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता हे खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या मॉलनाच तंबी दिली आहे. अॅपआधारित कंपन्यांकरवी अन्नपदार्थाची विक्री बंद करा किंवा या कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी वाहनतळांवर व्यवस्था करा, अन्यथा कारवाई करू, असा इशारा पोलिसांनी मॉलना दिला आहे.
स्वीगी, झोमॅटो अशा अॅपआधारित सेवांद्वारे आवडत्या हॉटेलमधील आवडते अन्नपदार्थ घरपोच मिळवता येतात. शिवाय डॉमिनोज पिझ्झा, पाश्चिमात्य खानावळी, हॉटेल्सनीही घरपोच पदार्थ पोहोचते करण्यासाठी डिलिव्हरी बॉय ठेवले आहेत. मुंबईसारख्या शहरांत अशा सेवा लोकप्रिय ठरत आहेत; पण त्याच वेळी या अॅपआधारित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा जाचही वाढतो आहे. ग्राहकाने मागणी केलेला पदार्थ संबंधित ठिकाणाहून घ्यायचा आणि कमीत कमी वेळेत त्याच्यापर्यंत पोहोचवण्याच्या स्पर्धेत वाहतुकीचे नियम कर्मचाऱ्यांकडून पायदळी तुडवले जातात. या स्पर्धेमुळे डिलिव्हरी बॉय सिग्नल मोडतात, विनाहेल्मेट आणि वेगात दुचाकी हाकतात. परिणामी अपघातांची शक्यता वाढते. डिलिव्हरी बॉय आणि रस्त्यावरील अन्य वाहनचालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. डिलिव्हरी बॉयच्या बेशिस्तीच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त अमितेष कुमार यांनी अॅपआधारित सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक मध्यंतरी घेतली.
कंपनीच्या डिलिव्हरी बॉयना वाहतुकीचे नियम पाळण्यास सांगा, त्यांचे समुपदेशन करा, अशा सूचना देतानाच वाहतूक पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगाही उगारला. महिन्याभरात विविध कंपन्यांच्या सहा हजारांहून अधिक डिलिव्हरी बॉयविरोधात वाहतूक पोलिसांनी गुन्हे नोंदवले.
या ‘डिलिव्हरी’ कर्मचाऱ्यांच्या दुचाकी मॉलच्या परिसरातील रस्त्यांवर उभ्या असतात. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडीही होते. या पार्श्वभूमीवर मॉलमधील हॉटेल्स, पाश्चिमात्य खानावळींमधून अन्नपदार्थ अॅपआधारित कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयकरवी विकणार असाल तर त्यांच्या दुचाकींची व्यवस्था स्वत:च्या वाहनतळावर करा, अशा सूचना केल्याचे सहआयुक्त कुमार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. अशी व्यवस्था न करणाऱ्या मॉलवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.