मुंबई : जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान कुणीही बदलू शकत नाही. संविधान बदलण्याच्या चर्चा हाच बाबासाहेबांचा अपमान आहे, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. दलित समाज विकसित भारताचा संकल्प ताकदीने पुढे घेऊन जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचा दावाही आठवले यांनी पत्रकाद्वारे केला. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमचे मुक्तिदाते डॉ. आंबेडकर यांचा ज्या काँग्रेस पक्षाने वारंवार अपमान केला, एकदा नाही तर दोनदा निवडणुकीत पराभव केला, त्यांनीच संविधान बदलले जाण्याची चर्चा करणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. मुळात अशा चर्चा करून दलित समाजाची फसवणूक आता करता येणार नाही. इतकी वर्षे राज्य करण्याची काँग्रेसची जी पद्धत होती, ती आता लागू पडणार नाही. आता आमचा समाज शिक्षित आहे, त्याचे सामाजिक भान जागृत झाले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि विरोधकांनी कितीही आरोप केले, तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही, असे आठवले म्हणाले. देशभरातील संपूर्ण दलित समाज ठामपणे मुख्य प्रवाहात येऊन विकसित भारताचे स्वप्न ताकदीने पुढे नेणाऱ्या मोदींबरोबर आहे, असा दावा त्यांनी केला. राजकीय हेतूने कुणी काहीही प्रतिक्रिया दिल्या, तर त्यावर समाज कधीही विश्वास ठेवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार नाहीत तर ते अधिक मजबूत करीत आहेत. सरकारला संविधान बदलायचे असते, तर लोकसभेत दहा वर्षे संपूर्ण बहुमत आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा >>> ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’बाबत फेरविचार करा; ठाकरे गटाची  निवडणूक आयोगास विनंती

आठवले म्हणाले की, मोदींनी आज विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे, त्याचा सर्वाधिक फायदा दलित समाजाला होणार आहे. शेवटच्या माणसाची उन्नती झाल्याशिवाय भारत विकसित होऊच शकत नाही. त्यामुळे गरीब आणि वंचित हे या स्वप्नांचे सर्वात मोठे हकदार असतील. आजही सर्वांसाठी घरे, गॅस, वीज, पाणी यांचे लाभार्थी शेवटचे घटक आहेत. हाच संविधानाचा खरा अर्थ आहे, जोवर शेवटचा माणूस मुख्य प्रवाहात येत नाही, तोवर संविधानाचा संकल्प पूर्ण होणार नाही. तो पूर्ण व्हावा, म्हणूनच आम्ही मोदींबरोबर आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची ३,२०० कोटींची जागा मोदींनी तीन दिवसांत दिली. बाबासाहेबांचे लंडनमधील घर स्मारकात रूपांतरित केले. देवेंद्र फडणवीस यांनी कोयासन विद्यापीठात बाबासाहेबांच्या पुतळयाचे अनावरण केले. आता तेथे नियमितपणे आंबेडकर जयंती साजरी होते. या कामांमुळे मोठया संख्येने आमचे बांधव मोदींच्या पाठीशी उभे असल्यानेच संविधान बदलण्याच्या चर्चा घडविल्या जात आहेत. – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion about constitution change is an insult to babasaheb says rpi leader ramdas athawale zws