मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत तातडीने मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिरायतीसाठी हेक्टरी ८,५०० रुपये, सिंचनाखालील पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपये व बागायतींसाठी हेक्टरी २२,५०० रुपये मदत दिली जाईल.
गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. अवकाळीमुळे २२ जिल्ह्यांतील तब्बल चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज या वेळी वर्तविण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी दिल्या. तीन हेक्टरच्या मर्यादेत आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच बाधित क्षेत्राची पाहणी करण्याची सूचना त्यांनी सर्व पालकमंत्र्यांना केली. पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>दत्ता दळवींची कार अज्ञातांनी फोडली, सुनील राऊत म्हणाले, “हे कृत्य करणारे शिंदे गटाचे नामर्द…”
बैठकीत मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत सादरीकरण केले. बाधित क्षेत्रांचे पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती या वेळी मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात आली. त्यावर राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून घ्यावेत आणि एकत्रित निधी वितरणाचा निर्णय विभागाने घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
मदत किती?
जिरायती शेतीसाठी हेक्टरी ८,५०० रु.
आश्वासित सिंचनाखालील
शेतीसाठी हेक्टरी १७,००० रु.
बागायती पिकांसाठी हेक्टरी २२,५०० रु.
मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांस ४ लाख रु.
६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास २.५ लाख रु.
जखमींना ७४ हजार रु.
घराची पडझड झाल्यास ४ हजार ते ६.५ हजार रु.
अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तीन हेक्टरच्या मर्यादेत त्यांना तातडीने मदत देण्यात येईल. पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल, कृषी विभागाने तातडीने एकत्रितरीत्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री