‘बदलणाऱ्या महाराष्ट्रा’चा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’ने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात राज्यातील शेती क्षेत्रातील सद्यस्थितीचा वेध घेण्यासाठी ‘शेती आणि प्रगती’ यावर चर्चासत्र होणार आहे. पुण्यात २४ आणि २५ फेब्रुवारीला हे दोनदिवसीय चर्चासत्र पार पडेल. महाराष्ट्रातील शेतीचा आणि शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीची चर्चा करताना भविष्यात या मूलभूत क्षेत्राची वाटचाल कशी असेल याचा वेध तज्ज्ञमंडळी घेतील.
कालौघात बदलत चाललेल्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांचा वेध घेण्यासाठी ‘बदलता महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू झाला. पहिल्या पर्वात शिक्षणव्यवस्था आणि दुसऱ्या पर्वात नागरीकरणाच्या आव्हानांचा वेध घेतल्यानंतर आता तिसऱ्या पर्वात कृषिक्षेत्राचा सर्वागीण वेध घेण्यात येणार आहे. ‘शेती आणि प्रगती’ या चर्चासत्रात ज्येष्ठ कृषितज्ज्ञ आणि शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आणि सहकाराच्या क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळी आपले विचार मांडणार आहेत.
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या प्रगतीचा इतिहास पाहता त्यात शेतीचे मोठे योगदान आहे. प्रगतीच्या वाटेवरील महाराष्ट्राची वाटचाल आणि शेतीचा प्रवास यांच्या सहप्रवासाचा आढावा आणि भविष्यातील आव्हाने, त्यावरील उपायांची चर्चा या कार्यक्रमात होईल. तसेच कृषी विद्यापीठांचे योगदान व उपयक्तता, शेती व सहकाराच्या या परस्परसंबंधांचा ऊहापोह, कोरडवाहू शेती आणि पाणी अशा विविध मुद्दय़ांचा ऊहापोह तज्ज्ञ मंडळी करतील.
कोरेगाव पार्क येथील ‘हॉटेल ताज विवांता’ येथे होणाऱ्या या चर्चासत्रात ‘महाराष्ट्राची शेती व प्रगती’, ‘शेती व सहकार’, ‘शेती-नवे तंत्र, नवे वाण, नवे ज्ञान’ असे तीन परिसंवाद पहिल्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारीला होतील. तर २५ फेब्रुवारीला ‘शेतीतील अभिनव प्रयोग’, ‘शेती व पाणी’ आणि ‘शेतीचे अर्थकारण व भवितव्य’ या विषयांवर परिसंवाद होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा