मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सोमवारी भेट होऊन चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून, वंचित महाविकास आघाडीत सहभागी होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी विशेषत: आम्हा दोघांचे वैचारिक व्यासपीठ एक आहे, असे सांगून ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी या आधीच शिवसेनेबरोबर युती करण्याची वंचित आघाडीची तयारी असून, त्याबाबत प्रकाश आंबेडकर व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यात दोन बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर सोमवारी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाल्याने युतीच्या चर्चेला आणखी वेग आल्याचे मानले जाते. ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये या दोन नेत्यांची बैठक झाल्याची माहिती शिवसेनेतील सूत्राकडून देण्यात आली.

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा सकारात्मक झाली आहे. काही विषयांवर अजून चर्चा सुरू आहे. पण लवकरच अंतिम निर्णय होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार का, या प्रश्नावर त्यांची तशी तयारी असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion positive uddhav thackeray claim after meeting prakash ambedkar ysh