पाच वर्षे होऊनही वीज, पाणी, रस्ते आदी सुविधांची एैशीतैशी!

मुंबईजवळ हक्काचे सेकंड होम हवे, या टिपिकल मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचा फायदा उठवीत ‘दिशा डायरेक्ट’ या कंपनीने शेती भूखंड, बंगलो, रिसॉर्ट आदींबाबत मांडलेल्या योजनेला मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु सलग पाच वर्षे प्रतीक्षेत राहूनही सेकंड होम उभारण्याचे आपले स्वप्न कंपनीच्या असहकारामुळे पूर्ण होऊ शकत नाही, हे पाहून हजारो गुंतवणूकदार कमालीचे निराश झाले आहेत. याबाबत कंपनीकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या गुंतवणूकदारांनी आता मात्र याविरुद्ध आवाज उठविण्याचे ठरविले आहे.

प्रकल्पांना उशिरा झाला हे खरे असले तरी आम्ही गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची ओरड अनाठायी आहे. अशा मोठय़ा प्रकल्पांमध्ये काही वेळा सुविधा पुरविण्यास वेळ लागतो. आश्वासनांची पूर्ती करण्यास आम्ही बांधील आहोत. ताम्हिणी प्रकल्प हा जवळजवळ पूर्ण झाला आहे. मुसळधार पावसामुळे त्यात अडथळा आला. या प्रकल्पाशी दिशा डायरेक्टचा थेट संबंध नसला तरी आपण जबाबदारी झटकू शकत नाही, असे ‘दिशा डायरेक्ट’चे व्यवस्थापकीय संचालक संतोष नाईक यांनी सांगितले. शिरोळमधील प्रकल्पात आम्ही रिसॉर्टच्या आराखडय़ाला मंजुरी घेतली आहे. त्याचे काम लवकरच सुरू करणार आहोत. वाडय़ातील वॉटरफ्रंट प्रकल्पही पूर्ण झाला आहे. तीन-चार गुंतवणूकदार वगळले तर कोणाच्याही तक्रारी नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

नाईक यांचा हा दावा गुंतवणूकदारांना मान्य नाही. हीच उत्तरे आम्ही गेली काही वर्षे ऐकत आहोत. आता आमचा विश्वास उरलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

फसवणुकीचा चौकार

  • गुंतवणूकदारांना फसवणुकीचा अनुभव यायला लागला तो रायगड जिल्ह्य़ातील ताम्हिणी घाटाजवळ असलेल्या ‘लँडमार्क मिडोज’ या प्रकल्पामुळे. ताम्हिणी प्रकल्पात ५०० ते ६०० गुंतवणूकदार सहभागी झाले. प्रत्येकाने दोन ते सात लाख रुपये गुंतविले. याशिवाय प्रत्येकाकडून रस्ते, वीज, पाणी आदी देखभालीपोटी ५० हजार रुपये विकास शुल्क म्हणूनही वसूल करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात काहीही सुविधा न मिळाल्याने वाढलेले जंगल आणि तुटलेले कुंपण यामध्ये आपला भूखंड कुठला हेही आता गुंतवणूकदारांना शोधावे लागते. याबाबत ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या वृत्तानंतर कंपनीने ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नाटक सुरू केले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संतोष नाईक यांनी गेल्या तीन वर्षांपासून ईमेलद्वारे वेळोवेळी लेखी केवळ पोकळ आश्वासने दिली, गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.
  • वाडय़ातील ‘वॉटरफ्रंट’ प्रकल्पातील गुंतवणूकदारांची व्यथा यापेक्षा वेगळी नाही. या प्रकल्पात सुरुवातीला कंपनीकडून मोठमोठी आमिषे दाखविण्यात आली. हक्काच्या सेकंड होमसोबत नदीलगत १० कॉटेजेस्, रेस्तराँ, हेल्थ क्लब, चिल्ड्रन्स पार्क, जलतरण तलाव आदी सुविधा पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले होते.  सेकंड होम उभारल्यानंतर या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मेंबरशिप कार्डापोटी ५० हजार रुपये वसूल करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात सुविधाच नसल्याने त्या उपभोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही यापैकी काही गुंतवणूकदारांनी सांगितले. या वर्षी एप्रिलमध्ये पाच कॉटेजेस् उभारण्यात आल्या. त्याआधी डिसेंबर २०१५ मध्ये जलतरण तलाव उभारण्यात आला खरा. परंतु त्याचा वापरही होऊ शकत नाही, असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. बाकी आमिषांची बोंब आहे, असेही त्यांनी सांगितले.
  • शिरोळ येथील ‘लँडमार्क हिल्स’ प्रकल्प या ७० एकर भूखंडावर पसरलेल्या ४५७ बिगरशेती भूखंडाचे प्रत्येकी आठ लाख रुपयांत वितरण करण्यात आले. गुंतवणूकदारांनी संपूर्ण पैसे भरेपर्यंत गोड गोड बोलणारे दिशा डायरेक्टचे कर्मचारी आता मात्र उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. २०१० मध्ये करारनामा झाल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी घरे बांधली. त्यांच्यापुरती वीज आणि पाणी आले. त्यानंतर उर्वरित गुंतवणूकदारांनी घरे बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु रस्ते, पाणी, वीज, सुरक्षा आदी सुविधा न पुरविल्याने घरे बांधणे शक्य झाले नाही, याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष वेधले. आता वाढलेले जंगल, तुटलेले कुंपण यातून भूखंडापर्यंत वाट कशी काढायची, असे प्रश्न त्यांना पडले आहेत.
  • मनोर येथील रेसो विला या प्रकल्पात प्रत्येक कॉटेजसाठी २७ ते ५५ लाख रुपये मोजण्यात आले. तलाव, नदी, बगिचासमोरील कॉटेजसाठी वेगवेगळी रक्कम आकारण्यात आली. जलतरण तलाव, मुलांसाठी स्वतंत्र खेळण्यासाठी परिसर, जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणेसाठी स्वतंत्र परिसर, टेनिस कोर्ट आदी सुविधा पुरविण्यात येणार होत्या. संपूर्ण पैसे भरूनही नोंदणी करारनामा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. क्लब मेंबरशिपपोटी एक लाख आणि विकास शुल्कापोटी दोन लाख रुपयेही आकारण्यात आले, असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. यापैकी एक गुंतवणूकदार संतोष अंबावकर आता ग्राहक न्यायालयाकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

गुंतवणूकदार एकत्र..

दिशा डायरेक्टकडून फसले गेलेल्या गुंतवणूकदार एकत्र आले आहेत.त्यांनी dishadirectcustomers@hotmail.com असा ईमेल आयडीतयार केला आहे. फसलेल्या गुंतवणूकदारांनी या ईमेलवर आपले अनुभव पाठवावेत, असे आवाहनही या गुंतवणूकदारांनी केले आहे.

 

Story img Loader