दिशा सतीश सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी आज मालवणी पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी हजेरी लावली. दुपारी १२ च्या सुमारास नारायण राणे आणि नितेश राणे चौकशीसाठी मालवणी पोलीस स्थानकामध्ये दाखल झाले.
विशेष म्हणजे राणेंचा ताफा जेव्हा पोलीस स्थानकामध्ये दाखल झाला तेव्हा यावेळी नितेश राणे हे स्वत: गाडी चालवत. दरम्यान चौकशीला येण्याआदी नितेश राणेंनी एक सूचक ट्विट केलंय, जे सोशल मीडियावर चर्चेत आहे. कालच राणे पिता-पुत्रांना या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन दिंडोशी न्यायालयाने मंजूर केलाय.
दिशाच्या आत्महत्येनंतर राणे पिता-पुत्राकडून दिशाच्या आत्महत्येबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित करून तिच्याविषयी अनेकदा आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते. दिशाची आई वासंती सतीश सालियन यांनी मालवणी पोलिसात राणे पिता-पुत्राविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याचसंदर्भातील चौकशीसाठी आज हे दोघे पोलीस स्थानकामध्ये दाखल झाले.
राणेंविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी हे करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच गुन्ह्याच्या चौकशीसह जबाब नोंदविण्यासाठी नितेश राणे आणि नारायण राणे यांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीविरोधात राणेंनी दिंडोशी न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने या दोघांना १० मार्चपर्यंत दिलासा दिलाय. १० मार्चपर्यंत या दोघांना अटक करता येणार नाही असा दिलासा न्यायालयाने दिलाय.
चौकशीला जाण्याआधी आज सकाळी नितेश राणेंनी ट्विटरवरुन एक सूचक पोस्ट केलेली. “खेळ तुम्ही सुरु केलाय, संपवणार आही. न्याय मिळणार”, असं नितेश राणेंनी म्हटलंय. यामध्ये त्यांनी जस्टीस फॉर दिशा सालियन म्हणजेच दिशाला न्याय मिळावा असा हॅशटॅघ वापरलाय.
१९ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. तसेच नितेश यांनीही अशाच पद्धतीची वक्तव्ये केली होती. याच प्रकरणात आज चौकशी करण्यात येत आहे.