केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुशांत सिंहची व्यवस्थापक असणाऱ्या दिशा सालियनबाबत केलेल्या वक्तव्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत. मुंबईतल्या मालवणी पोलीस स्टेशनने ४८ तासांमध्ये यासंदर्भात अहवाल सादर करावा असे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहे. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी या राजकारामुळे माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, आम्हाला काही झाले तर हे लोक जबाबदार असतील अशी प्रतिक्रिया दिशाच्या आईने दिली आहे.
दिशा सालियनची हत्या झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊ केला होता. तसेच हत्येआधी बलात्कार करण्यात आला होता असेही नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले होते. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर महिला आयोगाने यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर महापौरांनी दिशाच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण : नारायण राणेंना आरोप भोवणार?; महिला आयोगाने पोलिसांना दिले आदेश
“आम्ही दोन वर्षापूर्वीच या प्रकरणाची माहिती दिली होती. तरीही हे सर्वजण पुन्हा तेच आणत आम्हाला त्रास देत आहेत. या राजकारामुळे माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आम्ही रोज मरत आहोत. राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. या लोकांमुळे आम्हाला जगावे असं वाटत नाही. आमचे जर काही झाले तर हे लोकच जबाबदार असतील,” असा इशारा दिशा सालियाच्या आईने दिला आहे.
आम्हाला जगू द्या
कोणत्याही राजकारण्याने, अभिनेत्याने आम्हाला आता त्रास देऊ नये. आम्हाला जगू द्या. महापौरांनी येऊन आमचे सांत्वन केले. आम्ही घराबाहेरही पडत नव्हतो. आता थोडासा श्वास घेत आहोत तर पुन्हा त्रास दिला जात आहे. आम्हाला थोडं जगू द्या हेच आम्हाला सांगायचे आहे. ज्याप्रकारचे राजकारण सुरु आहे त्यावरुन आम्ही खूप नाराज आहोत. आम्ही या नेत्यांना मत देतो आणि हेच आमची आणि माझ्या मुलीची बदनामी करत आहेत. माझी मुलगी गेली आहे. त्याचे दुःख आम्ही सहन करत आहोत. पण या लोकांना काय हक्क आहे आमची बदनामी करण्याचा?, असा सवाल दिशा सालियनच्या आईने केला.
मुलीला गमावल्याचे दुःख तुम्हाला कळणार नाही
“आम्ही यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. माझी विनंती आहे की आम्हाला त्रास देऊ नका. आम्ही मुलीला गमावले आहे त्याचे दुःख तुम्हाला कळत नाही. आमच्या नावाची बदनामी झाली तर आम्हीसुद्धा काहीतरी करुन घेऊ आणि यासाठी हेच लोक जबाबदार असतील. पोलिसांकडे सगळे पुरावे आहेत. आरोप केले आहेत तसे काहीसुद्धा झालेले नाही. शवविच्छेदनामध्येही काहीही आढळलेले नाही,” असेही दिशाच्या आईने म्हटले.
नारायण राणेंच्या वक्तव्याने कुटुंबीयांना त्रास – किशोरी पेडणेकर
“या प्रकरणाच्या दोन वर्षानंतरसुद्धा दिशा सालियनच्या आई वडिलांना त्रास होईल अशी वक्तव्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याकडून केली जात आहेत. सर्व पुराव्यांवर अविश्वास दाखवला जात आहे. त्या दिवशी पार्टीसाठी दिशाचे लहाणपणीचे मित्र होते असे तिच्या पालकांनी सांगितले. आठवडाभर आधी एका व्यावसायिक कामात यश न मिळाल्याने ती तणावात होती. त्यामुळे तिने ते मनाला लावून घेतले आणि तिने आत्महत्या केली. दिशाची व्यवसायाव्यतिरिक्त कोणासोबतही मैत्री नव्हती. ती सुशांत सिंहची व्यवस्थापक नव्हती. सुशांतला ती एकदाच भेटली होती असे तिच्या आई वडिलांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी सर्व तपास केला आहे. मी तक्रार केल्यानंतर दिशाच्या वडिलांनी आम्हाला भेटायला बोलवले,” असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.