मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी तिचे सतीश सालियन यांनी केलेली याचिका योग्य खंडपीठापुढे सूचीबद्ध करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी महानिबंधक कार्यालयाला दिले.

सतीश सालियन यांची याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे बुधवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी ही याचिका महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित असल्यामुळे तिची सुनावणी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणे अपेक्षित असल्याचे सालियन यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेऊन खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले.

दिशा सालियन हिचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर, काही दिवसांनी म्हणजेच १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा वांद्रे येथील त्याच्या सदनिकेत मृतावस्थेत आढळून आला होता.

सुशांतने आत्महत्या केल्याचे प्रकरण पोलिसांनी सुरुवातीला नोंदवले होते. तथापि, सुशांतने आत्महत्या केलेली नाही, तर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केल्यावर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यानंतर, दिशा हिचाही खून करण्यात आला होता आणि शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.

दिशाच्या कुटुंबीयांनी तिचा खून झाल्याचा आरोप त्यावेळी फेटाळले होते. त्यांनी न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्रही दाखल केले होते. परंतु, दिशाचे वडील सतीश यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेऊन दिशाचा खून झाल्याचा दावा केला आहे. तसेच, या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याशिवाय, या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांना आरोपी करून अटक करण्याची प्रमुख मागणीही सतीश सालियान यांनी केली आहे.

दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिचा खून करण्यात आला. त्यानंतर, या प्रकरणाशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रकरण दडपण्यात आल्याचा दावाही सालियन यांनी याचिकेत केला आहे. मुंबई पोलिसांनी न्यायवैद्यक, परिस्थितीजन्य पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष विचारात न घेता दिशा हिने आत्महत्या केल्याचा किंवा तिचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवले व प्रकरण घाईघाईने बंद केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.