मुंबई : धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रूग्णांसाठी लागू असलेल्या सवलतींची माहिती दर्शनी भागात प्रदर्शित करण्याच्या नियमाची अंमलबजावणी करावी. तसेच राखीव रुग्णशय्यांची आकडेवारी डिजीटल व अद्ययावत स्वरुपात दर्शनी भागात लावावी. तक्रार निवारण आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी धर्मादाय विभागाच्या अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकही उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील विविध विषयांचा, तसेच कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरही उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धर्मादाय रुग्णालये सरकारी लाभ घेतात. मात्र गरिबांसाठी खाटा आरक्षित ठेवताना किंवा दुर्बल गटातील रुग्णांना सवलती देताना हात आखडता घेतात. त्यांच्या कारभारात पारदर्शकता नसल्यामुळे गरिबांना या रुग्णालयातील सोयी – सुविधाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या नियमांची कडक अंमलबजावणी करावी अशी सूचना यावेळी वायकर यांनी केली.

धर्मादाय रुग्णालयामध्ये निर्धन रुग्णांना मोफत उपचार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार मिळावेत. तसेच एकूण रुग्णांपैकी धर्मादाय रुग्णांसाठी उपलब्ध रुग्णशय्या, व्याप्त रुग्णशय्या व रिकाम्या रुग्णशय्या आदींच्या माहितीचा फलकही असावा, असेही निर्देश जाधव यांनी दिले.

केंद्राच्या आयुषमान भारत योजनेच्या अनुषंगाने रूग्णांचा वैद्यकीय इतिहास, चाचण्यांचे अहवाल हे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठीच्या तांत्रिक अडचणी सोडवून त्या शासनाने मार्गी लावल्या आहेत, असेही जाधव यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपधर्मादाय आयुक्त वैभव जाधव यांच्यासह सर्व संबंधित वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महापालिकेचेही कान टोचले

मुंबई महानगरपालिकेच्या विविध रूग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याबद्दलही जाधव यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला. जेनेरिक औषधे स्वस्त दरात देण्याच्या योजनेअंतर्गत औषध दुकानासाठी जागा दिली जात नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णांना आवश्यक ती औषधे उपलब्ध व्हावीत, तसेच राष्ट्रीय आरोग्य निधी, धर्मादाय रुग्णालयांच्या ठिकाणी रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, सर्वसामान्य रुग्णांचे हित पाहून केंद्रीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित करावे, असेही निर्देश प्रतापराव जाधव यांनी दिले.

जेनेरिक औषधांसाठी जागा उपलब्ध करावी

सर्व आढावा घेतल्यानंतर केंद्रीय प्रतापराव जाधव म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अधिक प्रयत्न व्हायला हवेत. रुग्णालयांच्या ठिकाणी जेनेरिक औषधांच्या योजनेचा फायदाही रूग्णांसाठी उपलब्ध व्हावा, जेणेकरून वाजवी दरामध्ये योग्य औषधे उपलब्ध होतील. प्रमुख रुग्णालये तसेच उपनगरीय रूग्णालयांच्या ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत औषधे मिळावीत, यासाठी गाळे / जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, अशी सूचना जाधव यांनी केली.