महापालिकेची आगामी लढाई ही भाजपबरोबर असणार हे निश्चित असल्यामुळे स्वबळ वाढविण्यासाठी शिवसेनेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसेच्या पदाधिकारी व नगरसेवकांसाठी दरवाजे उघडण्याचे धोरण स्वीकारले आहे. सेना नेतृत्वाच्या या धोरणामुळे शिवसेनेत मोठी नाराजी निर्माण झाली आहे. दिल्लीत किरण बेदी यांना प्रवेश देऊन जी चूक भाजपने केली, तीच चूक शिवसेना नेतृत्व करत असल्याचे सेनेच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या दोन तर काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी सोमवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यापूर्वी नवी मुंबईतील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवकांना प्रवेश देण्यात आला. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत शिवसेनेचे स्थान भक्कम करण्यासाठी फोडाफोडी सुरू केली असून ठाणे शहरातही मनसेचे काही नगरसेवक सेनेमध्ये प्रवेशाच्या तयारीत आहेत. या साऱ्यात वर्षांनुवर्षे काम करणारा निष्ठावान शिवसैनिक डावलला जाणार असल्याची भावना सेनेत बळावत असून बाहेरून येणाऱ्यांना पदे व उमेदवारी मिळणार असेल तर आम्ही केवळ सतरंज्याच घालायच्या का, असा सवालही सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दबक्या आवाजात केला जात आहे.
यापूर्वी माजी मंत्री गणेश नाईक यांना शह देण्यासाठी विजय चौगुले यांना लोकसभा व त्या पाठोपाठ विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. नारायण राणे यांचे समर्थक रवी फाटक यांना सेनेत प्रवेश देऊन थेट आमदारकीची उमेदवारी दिली. त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना नगरसेवक बनविण्यात आले. दरम्यानच्या काळात मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांना स्थायी समिती अध्यक्षपद दिल्यानंतर सेनेत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. ठाणे परिवहन घोटाळ्यात ज्यांना शिक्षा झाली त्यांनाच आता शिवसेनेतही प्रवेश देण्याचे घटत असल्यामुळे ठाण्यात ‘शिंदेशाही’विरोधात शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसे नगरसेवक संपर्कात?
मुंबई महापालिकेत मनसेची ताकद खच्ची करण्यासाठी सेनेचे काही नेते प्रयत्नशील असून १९ नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सेनेच्या एका नेत्याने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. एकीकडे भाजपकडून मनसेच्या नगरसेवकांना खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे सेनेचेही प्रयत्न सुरु आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Displeasure in shiv sena over congress ncp leaders entry
Show comments