मुंबई : कवी नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित ‘सारं काही समष्टीसाठी’ या कला आणि साहित्य महोत्सवासाठी शासकीय मदत घेतल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये हा वाद जुंपला असून निषेध पत्रकांबरोबरच समाज माध्यमांवरही या वादाचे पडसाद जोरदार उमटले आहेत.

भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे ११ व १२ एप्रिल रोजी हा महोत्सव पार पडला. नामदेव ढसाळ फाऊंडेशन आणि समष्टी फाऊंडेशन या महोत्सवाचे आयोजक होते. महोत्सवाच्या उद्घाटनास मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार निमंत्रित होते. शासनाची मदत घेतल्याबद्दल ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्त्यांनी महोत्सवाकडे पाठ फिरवली होती. त्यात मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी पं. दिनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदय विचार हा कवी नामदेव ढसाळ यांच्या विचारांशी जुळणारा होता, असे वक्तव्य केल्याचे आरोप झाले.

याप्रकरणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शेलार तसेच आयोजकांचा निषेध केला. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या या विरोधाला युवा कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘सरकारचा इतकाच तिटकारा असेल तर निवृत्ती वेतनही सोडा’ असे आव्हान युवा कार्यकर्त्यांनी ज्येष्ठांना दिल्याने वाद आणखी चिघळला. दोन दिवसाच्या या महोत्सवात गीतकार स्वानंद किरकिरे, पत्रकार राजू परूळेकर, पत्रकार ज्ञानेश महाराव, गीतकार जावेद अख्तर यांची उपस्थिती होती.