मुंबई : पाच हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालकीचे ‘लोढा’ हे नाव वापरण्यावरून अभिषेक आणि अभिनंदन या लोढा बंधुंमध्ये सुरू झालेला वाद अखेर मिटला आहे. माजी न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांनी यामध्ये यशस्वी मध्यस्थी केली. हा वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवण्याचा सल्ला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने लोढा बंधुंना दिला होता. तो दोन्ही भावांनी मान्य केला.
न्यायालयाने दोघांमधील वाद मिटवण्यासाठी माजी न्यायमूर्ती रवींद्रन यांची मध्यस्थी म्हणून नियुक्ती केली होती. या वादावर तोडगा काढण्यात आल्याचे लोढा बंधुंनी सोमवारी एका अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले. लोढा हे नाव वापरण्याबाबत दोन्ही बंधुंमध्ये सहमती झाल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.दोन्ही भावांमध्ये झालेल्या तडजोडीनुसार, थोरले बंधू अभिषेक लोढा यांची ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड’ (एमडीएल) ही कंपनी ‘लोढा अॅण्ड लोढा ग्रुप’ या व्यापारचिन्हाचे मालक असतील आणि त्यांना हे नाव वापरण्याचा विशेषाधिकार असेल. तर धाकटे बंधू अभिनंदन लोढा ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ (एचओएबीएल) या व्यापारचिन्हाचे मालक असतील आणि आणि त्यांना हे वापरण्याचा विशेषाधिकार असेल. याशिवाय, लोढा ग्रुप आणि हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या दोन्ही कंपन्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध असणार नाही आणि दोन्ही कंपन्यामध्ये त्याबाबत विस्तृत समन्वय साधला जाईल.
अभिनंदन लोढा यांना लोढा ग्रुप किंवा एमडीएल किंवा अभिषेक तोढा यांच्या इतर व्यवसायांमध्ये कोणताही अधिकार असणार नाही किंवा ते त्यावर दावाही सांगणार नाहीत. हीच बाब अभिषेक यांना अभिनंदन यांच्या मालकीच्या कंपन्या आणि इतर व्यवसायांबाबत लागू होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.वादावर तोडगा निघाल्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक आणि अभिनंदन लोढा यांनी मध्यस्थी प्रक्रियेत मार्गदर्शन केल्याबद्दल उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉक्टर आणि वादावर तोडगा काढण्यात यशस्वी ठरलेले माजी न्यायमूर्ती रवींद्रन यांचे आभार मानले.
दोघांमधील वाद काय ?
– अभिषेक लोढा यांच्या ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड’ने काही दिवसांपूर्वी अभिनंदन यांच्या ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या कंपनीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन दावा दाखल केला होता. त्यात, ‘लोढा’ या व्यापारचिन्हाचे स्वामित्त्वहक्क आपल्याकडे असून इतर कोणीही ते वापरू शकत नाही. त्यामुळे, ‘लोढा’ हे व्यापारचिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी अभिषेक यांनी केली होती.
– प्रकरणाच्या पहिल्याच सुनावणीच्या वेळी, हा वाद दोन भावांमधील असल्याचे दिसते, असे न्यायमूर्ती डॉक्टर यांच्या एकलपीठाने म्हटले होते. तसेच, ‘लोढा’ या नावावरून सुरू असलेला वाद दोन बंधु मध्यस्थांमार्फत सोडवण्यास तयार आहेत का? अशी विचारणा केली होती. त्याला दोन्ही लोढा बंधुंनी सहमती दाखवली होती.